
शिवसेना ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि उबाठाच्या उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी, माजी नगरसेवक नाना अंबोले यांच्यासह उप शाखाप्रमुख, गट प्रमुख, शाखाध्यक्ष आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे उपस्थित होत्या. या पक्ष प्रवेशाने महापालिका निवडणुकीपूर्वी उबाठा गटाला जोरदार धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मागील अडीच वर्षात सर्वसामान्यांना सोन्याचे दिवस आणण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून केले, असं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एकीकडे विकास प्रकल्प आणि दुसरीकडे लोकाभिमुख योजना या दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न सरकारने केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या निवडणुकीत 80 जागा लढवून 60 जागा जिंकलो. तर कोणी 100 जागा लढवून 20 जागा जिंकल्या, यावरुन खरी शिवसेना कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले, असं यावेळी शिंदे म्हणाले.
त्यांच्या आरोपाला आरोपातून नाही तर कामातून उत्तर दिले. बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते, सत्ता जाते पण नाव जाता कामा नये, ते नाव टिकवण्याचे काम आपण केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या विचारानुसार आपले सरकार काम करतेय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुंबईत 15 ते 20 वर्षांपूर्वी जी कामे व्हायला हवी होती, ती आपण मागील अडीच वर्षात सुरु केली, असा दावा यावेळी शिंदे यांनी केला.
मुंबईत अटल सेतु, कोस्टल रोड झाला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची विमा सुरक्षा 1.5 लाखांवरुन 5 लाख केली. हे काम करणारे सरकार आहे. ही काम करणारी शिवसेना आहे. धनुष्यबाण ही आपली निशाणी आहे. धनुष्यबाण आणि भगवा झेंडा हे आपले इमान आहे, श्वास आहे आणि आपला अभिमान आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिंदे यांनी केलेल्या कामाने प्रभावित होत मूळ शिवसेनेत प्रवेश केला असे माजी नगरसेवक संजय घाडी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान नाना अंबोले यांच्यावर वरळी व शिवडी विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. तर संजना घाडी यांची शिवसेनेच्या उपनेते आणि प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world