निनाद करमरकर. अंबरनाथ
अंबरनाथमध्ये प्रचारादरम्यान एक महिला थेट गटारात पडल्याची घटना घडली. गटाराला झाकण नसल्यानं महिला गटारात पडली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
अंबरनाथ विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे रिंगणात असलेले रुपेश थोरात यांचा अंबरनाथ पूर्वेच्या बी केबीन भागातील आंबेडकर नगर परिसरात प्रचार सुरू होता. यादरम्यान एक महिला झाकण नसलेल्या उघड्या गटारात पडली.
यावेळी सोबतच्या कार्यकर्त्यांनी तिला बाहेर काढलं. सुदैवानं या महिलेला फारशी इजा झाली नाही. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. यानंतर आता निवडणूक लढवणाऱ्या सगळ्याच उमेदवारांनी किमान गटारावर झाकणं तरी बसवण्याची मागणी अंबरनाथ पालिकेकडे करा, असा सूर उमटत आहे.
बालाजी किणीकर विजयी होतील- श्रीकांत शिंदे
दुसरीकडे विद्यमान आमदार बालाजी किणीकर यांचा प्रचारही जोरात सुरु आहे. अंबरनाथ शहरात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठा उत्साह पाहायला मिळत असून महायुतीचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांना लोकसभेपेक्षाही जास्त मताधिक्य मिळेल आणि ते विजयी होतील, असा विश्वास कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.