Ashok Kharat: भोंदू खरातचं बँक लॉकर पाहून ईडीचे अधिकारीही थक्क! काय-काय सापडलं?

Ashok Kharat Case: अशोक खरात याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या बँक लॉकरमधून 1.10 कोटी रुपयांचे सोने आणि परदेशी चलनासह एकूण 1.17 कोटींचा ऐवज जप्त केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ashok Kharat Case Update: महिलांचे लैंगिक शोषण आणि खंडणीच्या आरोपाखाली अटकेत असलेला नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातवर आता ईडी कारवाई सुरु केली आहे. नाशिकमधील 'विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक' येथील खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या नावावर असलेल्या लॉकरची झडती घेण्यात आली. त्यावेळी लॉकरमधून कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. खरात याच्या मुलीच्या उपस्थितीत ईडीने हे लॉकर उघडले.

लॉकरमध्ये काय सापडले?

  • सोने - 1.10 कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने.
  • परदेशी चलन - 5500 अमेरिकन डॉलर (सुमारे 5.19 लाख रुपये).
  • चांदी - 1.89 लाख रुपयांचे चांदीचे दागिने.

(नक्की वाचा-  Tamil Nadu Election: थलपती विजयच्या TVK ला काँग्रेसचा पाठिंबा; मात्र ठेवली मोठी अट)

42 लाख रोख आणि 90 मालमत्तेची कागदपत्रे

यापूर्वी एप्रिल महिन्यात ईडीने नाशिक, पुणे आणि शिर्डी येथील खरात याच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यावेळी 2.4 कोटींचा बँक निधी गोठवण्यात आला होता. तर 42 लाख रुपये रोख आणि कोट्यवधी रुपये किमतीच्या 90 मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. तसेच, खरात याच्याशी संबंधित एक आलिशान 'मर्सिडीज-बेंझ' कारही जप्त करण्यात आली आहे.

Advertisement

काय आहे मुख्य गुन्हा?

महिलांवर लैंगिक अत्याचाराव्यतिरिक्त नाशिक पोलिसांनी मार्च महिन्यात खरात विरुद्ध एका बांधकाम व्यावसायिकाकडून 4 ते 5 कोटी रुपये उकळल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. या तक्रारीनुसार, खरातने 2018-19 मध्ये विविध कारणांनी व्यावसायिकाकडून पैसे उकळले आणि त्याची 90 लाखांची लक्झरी कारही स्वतःच्या नावावर करून घेण्यास भाग पाडले. याच गुन्ह्याचा आधार घेत ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला आहे. हिंदुस्थान टाइम्स याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

(नक्की वाचा-  PCMC Illegal Schools List: पिंपरी-चिंचवडमधील 'या' शाळा अनधिकृत; प्रवेश न घेण्याचे पालिकेचे पालकांना आवाहन)

60 बँक खात्यांचे गूढ

तपासात असे समोर आले आहे की, खरातने 'समता नागरी सहकारी पतसंस्था' येथील तब्बल 60 बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रकमा जमा केल्या होत्या. ही खाती खरात आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या नियंत्रणात होती. याशिवाय, सामान्य वस्तू 'दैवी शक्ती' असलेल्या किंवा 'मंत्रावलेली' असल्याचे सांगून भक्तांना चढ्या दराने विकून त्याने कोट्यवधी रुपये जमा केले आणि त्यातून अनेक भूखंड खरेदी केल्याचा संशय ईडीला आहे.
 

Topics mentioned in this article