Pune News: एकनाथ खडसे यांचे जावई खेवलकर यांना मोठा दिलासा; फॉरेन्सिक अहवालात मोठा खुलासा

Pune News: पुण्यातील खराडी भागातील एका हॉटेलमध्ये 25 जुलै रोजी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

पुण्यातील खराडी येथे एका हॉटेलमध्ये झालेल्या हाय-प्रोफाइल पार्टीवर गुन्हे शाखेने छापा टाकल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल मनीष खेवलकर यांचा समावेश होता. मात्र, आता या प्रकरणातून डॉ. खेवलकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चौकशी अहवालानुसार, डॉ. प्रांजल खेवलकर यांनी अमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

पुण्यातील खराडी भागातील एका हॉटेलमध्ये 25 जुलै रोजी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी डॉ. प्रांजल मनीष खेवलकर यांच्यासह निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर महमंद सय्यद, सचिन सोमाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव, ईशा देवज्योत सिंग आणि प्राची गोपाल शर्मा अशा एकूण 7 आरोपींना अटक केली होती.

पोलिसांनी घटनास्थळावरून 2 ग्रॅम 70 मिलीग्रॅम कोकेन, 70 ग्रॅम गांजासदृश पदार्थ, हुक्का पात्र, दहा मोबाइल संच, सुगंधी तंबाखू, दोन मोटारी आणि मद्याच्या बाटल्या असा मोठा मुद्देमाल जप्त केला होता. या जप्त केलेल्या वस्तूंच्या आधारावर पोलिसांनी अमली पदार्थ सेवन आणि बाळगल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू केली होती.

Forensic अहवालात काय झाले स्पष्ट?

या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेले कोकेन आणि गांजासदृश पदार्थ तसेच डॉ. खेवलकर यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. या तपासणीचा अहवाल नुकताच पुणे पोलिसांना प्राप्त झाला आहे.

Advertisement

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, डॉ. प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन केले नव्हते. डॉ. खेवलकर यांना या प्रकरणात दिलासा देणारा हा महत्त्वाचा पुरावा आहे. पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रासोबतच वैद्यकीय प्रयोगशाळेचा हा महत्त्वाचा अहवाल जोडला असल्याचे समजते. या अहवालामुळे एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. कारण या प्रकरणामुळे त्यांच्या कुटुंबावर मानसिक ताण निर्माण झाला होता.

जामीन मंजूर पण तपास सुरूच

या अहवालामुळे डॉ. खेवलकर यांना वैयक्तिक पातळीवर मोठा दिलासा मिळाला असला तरी, ते या प्रकरणातून पूर्णपणे मुक्त झालेले नाहीत. त्यांना 25 सप्टेंबर रोजीच न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.या पार्टीमध्ये अमली पदार्थांचे सेवन केले गेले नाही, तरीही अमली पदार्थ सापडले आहेत. त्यामुळे, या पार्टीमध्ये हे अमली पदार्थ कोणी पुरवले, तसेच या ड्रग्ज रॅकेटचे मूळ कोठे आहे, या दिशेने पुणे पोलिसांकडून सखोल तपास अजूनही सुरू आहे.

Advertisement

Topics mentioned in this article