Eknath Shinde: "सत्तेपेक्षा सिद्धांत अन् धर्म श्रेष्ठ"; एकनाथ शिंदेंचा 'सनातन मार्तंड' पुरस्काराने सन्मान

वाराणसी येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान आयोजित 'संस्कृती संसद २०२६' मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अखिल भारतीय संत समिती आणि गंगा महासभेकडून अत्यंत मानाचा 'सनातन मार्तंड पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 'धर्मध्वजाधारक' ही उपाधीही बहाल करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 3 mins

उत्तर प्रदेशातील धार्मिक व सांस्कृतिक नगरी वाराणसी (काशी) येथे आयोजित तीन दिवसीय 'संस्कृती संसद २०२६' या आध्यात्मिक महाकुंभात महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक परंपरेचा मोठा गौरव करण्यात आला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देशभरातील प्रमुख साधू-संत, महामंडलेश्वर आणि धर्माचार्यांच्या उपस्थितीत 'सनातन मार्तंड पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यासोबतच त्यांना 'धर्मध्वजाधारक' ही विशेष उपाधी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यासपीठावरून उपस्थितांवर पुष्पवृष्टी करत देशभरातून आलेल्या संत-महंतांना साष्टांग प्रणाम केला.

"हा सन्मान महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा अन् वारकऱ्यांचा"

"सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, सत्तेपेक्षा सत्य मोठे आणि अधिकारापेक्षा धर्म व कर्तव्य नेहमीच श्रेष्ठ असते. सनातन धर्म, संत समाज, भारतीय संस्कृती आणि धर्मरक्षणासाठी माझ्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी पूर्ण निष्ठेने समर्पित राहीन. संत समाजाने दिलेला हा सन्मान माझा एकट्याचा नसून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा, भावांचा, शेतकऱ्यांचा, युवकांचा आणि वारकरी संप्रदायाचा आहे", असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 'गर्व से कहो हम हिंदू हैं' या विचारांचा पुनरुच्चार करत एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, "पालघरमध्ये साधूंची निर्घृण हत्या झाल्यानंतर धर्मरक्षणासाठी आणि तत्त्वांच्या जपणुकीसाठी आम्ही सत्तेचा त्याग करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री, मी आजही एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच जनतेची सेवा करत आहे."

Advertisement

काशी अन् महाराष्ट्राच्या शतकानुशतकांच्या नात्याचा गौरव

काशी ही भारताची आत्मा असल्याचे सांगत शिंदे यांनी महाराष्ट्राच्या अभूतपूर्व शौर्य आणि संत परंपरेची आठवण करून दिली.  संत ज्ञानेश्वरांनी दिलेला भागवत धर्माचा संदेश, संत नामदेवांनी पंजाबपर्यंत फडकावलेली भागवत पताका, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीहून आलेले गागाभट्ट यांचा उल्लेख त्यांनी केला. धर्मांतर नाकारत अमानुष अत्याचार सहन करून धर्मरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा त्यांनी गौरव केला. महाराष्ट्रात गोमातेला 'राज्यमाता'*दर्जा देणे, व्यक्तीच्या नावापुढे आईचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना', तसेच छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि धाराशिव या ऐतिहासिक नामांतरांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणात आवर्जून उल्लेख केला.

मंदिरांसोबत रुग्णालये, तीर्थक्षेत्रांसोबत आधुनिक शाळा आणि विकासासोबत सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांचा इतिहास, योग, संस्कृत, भगवद्गीता आणि नैतिक मूल्यांचे संस्कार नव्या पिढीला देण्याचे आवाहन त्यांनी केले. सनातन धर्म आणि लोकशाही संस्थांविरोधात अविश्वास व अराजकता निर्माण करणाऱ्या शक्तींविरोधात वैचारिक एकजूट आवश्यक असल्याचे सांगत संतांचे आशीर्वाद, युवकांची शक्ती आणि शासनाचा सेवासंकल्प यातून भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 'ना झुकेगा स्वाभिमान, ना बदलेगा विचार' या घोषणेसह त्यांनी 'हर हर महादेव, जय श्रीराम'च्या जयघोषात एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

देशभरातील दिग्गज संत-महंतांची महाउपस्थिती

वाराणसीच्या रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरीजी, अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष जगद्गुरू पूज्य अविचल देवाचार्य महाराज, राष्ट्रीय महामंत्री पूज्य स्वामी जितेंद्रानंद सरस्वती महाराज, कोषाध्यक्ष महामंडलेश्वर पूज्य जनार्दन हरिजी महाराज, संस्कृती संसद आयोजन समितीचे अध्यक्ष सुनील देवधर, शिवसेना आध्यात्मिक धर्मवीर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आर. अक्षय महाराज भोसले यांच्यासह काशी विद्वत परिषदेचे प्राध्यापक व देशभरातील शेकडो पीठाधिपती उपस्थित होते.


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world