Eknath Shinde: पुष्पगुच्छ नको आणि सोहळेही नको! शिंदेंनी वाढदिवसाबाबत घेतला 'हा' कठोर निर्णय, कारण काय?

Eknath Shinde Cancels Birthday Celebrations: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Eknath Shinde Birthday : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस 9 फेब्रुवारी रोजी आहे.
मुंबई:

Eknath Shinde Cancels Birthday Celebrations: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या अकाली निधनामुळे सध्या राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. राजकारणातील एक खंबीर नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.  याच दुःखद घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस असून, या दिवशी कोणताही आनंदाचा सोहळा किंवा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.

शिंदेंनी काय सांगितलं?

अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे आणि या धक्क्यातून राज्य अजूनही सावरलेले नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, अजित दादांच्या जाण्याने मी केवळ एक सहकारीच नाही, तर माझा जवळचा मित्र गमावला आहे. ही हानी कधीही भरून न येणारी आहे. पवार कुटुंब सध्या ज्या कठीण परिस्थितीतून जात आहे, त्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

( नक्की वाचा : Solapur News : पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन, सोलापूरसाठी प्रगतीचे वरदान; असा होणार मोठा फायदा )
 

शुभेच्छांचे होर्डिंग आणि पुष्पगुच्छ टाळण्याचे आवाहन

अशा दुःखद वातावरणात वाढदिवसाचे सोहळे किंवा समारंभ करणे मला अजिबात योग्य वाटत नाही, असे मत एकनाथ शिंदे यांनी मांडले आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना एक विशेष विनंती केली आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ घेऊन येऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारचे भेटीचे साहित्य आणू नये. यासोबतच शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेही शुभेच्छा देणारे मोठे होर्डिंग्स लावू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

परिस्थितीचे गांभीर्य राखण्यासाठी कार्यकर्त्यांना विनंती

वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये, अशी स्पष्ट सूचना एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सध्याच्या या कठीण प्रसंगी आपण सर्वजण संवेदनशील राहून परिस्थितीचे गांभीर्य जपू या, अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, सहकाऱ्याप्रती असलेली ही आदरभावना कार्यकर्त्यांनीही पाळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article