जाहिरात

Solapur News : पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन, सोलापूरसाठी प्रगतीचे वरदान; असा होणार मोठा फायदा

Pune-Hyderabad Bullet Train: पुणे-हैदराबाद प्रवासाचं गणित आता पूर्णपणे बदलणार असून या हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला जणू बुलेट ट्रेनचा वेग मिळणार आहे.

Solapur News : पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन, सोलापूरसाठी प्रगतीचे वरदान; असा होणार मोठा फायदा
Solapur News : या प्रकल्पामुळे सोलापूर शहर हे पुणे आणि हैदराबादच्या जवळ येणार आहे.
मुंबई:

Pune-Hyderabad Bullet Train: पुणे-हैदराबाद प्रवासाचं गणित आता पूर्णपणे बदलणार असून या हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला जणू बुलेट ट्रेनचा वेग मिळणार आहे. तासनतासांचा प्रवास काही मिनिटांवर येणार असल्याने केवळ प्रवासच सुखकर होणार नाही, तर सोलापूरच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीची नवी दारे उघडली जाणार आहेत. मुंबई, पुणे आणि हैदराबाद यांसारख्या मोठ्या आयटी हबला जोडणारा हा प्रकल्प सोलापूरसाठी गेमचेंजर ठरणार असून, भविष्यात सोलापूर शहर दळणवळणाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल अशी चिन्हे आहेत.

काय आहे प्रकल्प?

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झालेला मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. हा मार्ग 350 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी सज्ज केला जाणार आहे. 

सध्या पुणे ते हैदराबाद हे सुमारे 600 किलोमीटरचे अंतर रस्ते मार्गाने पार करण्यासाठी 8 ते 10 तास लागतात, तर रेल्वेने सरासरी 9 तास खर्च होतात. मात्र, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर हेच अंतर अवघ्या 1 तास 55 मिनिटांमध्ये पार करणे शक्य होणार आहे. यामुळे सोलापूर आणि पुणे किंवा हैदराबाद ही शहरे एकमेकांच्या इतकी जवळ येतील की, नागरिक दैनंदिन कामासाठी सहज ये-जा करू शकतील.

( नक्की वाचा : Pune News: पुणेकरांना बुलेट ट्रेनचे डबल गिफ्ट! मुंबई आणि हैदराबादचा प्रवास सुसाट, वाचा तुमचं स्टेशन आणि माहिती )

सोलापूरचा कसा फायदा होणार?

सोलापूर जिल्ह्यासाठी या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सोलापूरमधून मोठ्या प्रमाणावर लोक नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त पुणे किंवा हैदराबादला स्थलांतर करतात. हायस्पीड रेल्वेमुळे हे स्थलांतर थांबण्यास मदत होईल, कारण लोक सोलापूरमध्ये राहून काही मिनिटांत पुणे किंवा हैदराबाद गाठू शकतील. 

सोलापूरचा वस्त्रोद्योग, वैद्यकीय सेवा आणि कृषी क्षेत्राला या वेगवान कनेक्टिव्हिटीचा मोठा फायदा होईल. इंदापूर, दौंड आणि उरुळी या भागातील प्रवाशांनाही या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळणार असून, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

वाहतूक तज्ज्ञांच्या मते, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमधील शहरांची अर्थव्यवस्था या प्रकल्पामुळे झपाट्याने सुधारेल. सध्या सोलापूर-पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत असली, तरी हायस्पीड कॉरिडॉरमुळे प्रवासाला मिळणारी गती अभूतपूर्व असेल. विमानसेवेच्या तुलनेत हा पर्याय अधिक किफायतशीर ठरणार असल्याने सर्वसामान्यांनाही याचा लाभ घेता येईल. 

( नक्की वाचा : Mumbai-Pune : साडेतीन तासांचा प्रवास मिनिटांवर येणार; मुंबई-पुणे हाय-स्पीड रेल्वेचा असा आहे प्लॅन )
 

महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण होण्यासही यामुळे मदत होणार आहे. व्यापारी उलाढाल वाढल्यामुळे सोलापूर हे एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे केवळ अंतरच कमी होणार नाही, तर सोलापूरच्या ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक संस्था आणि उद्योगांनाही नवी उभारी मिळेल. हायस्पीड रेल्वेची अंमलबजावणी वेगाने झाल्यास सोलापूरचा कायापालट निश्चित मानला जात आहे. रेल्वे प्रवासी संघटना आणि अभ्यासकांनी या प्रकल्पाचे स्वागत केले असून, यामुळे भविष्यातील दळणवळणाची गरज पूर्ण होईल आणि सामान्य प्रवाशांचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com