जाहिरात

Eknath Shinde : 'मला मुख्यमंत्री करा म्हणत दिल्लीत कोण फिरतंय?'; CM शिंदेंची ठाकरेंवर सडकून टीका

विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या दसरा मेळाव्यात प्रचाराचा नारळ फुटल्याचं दिसून येत आहे.

Eknath Shinde : 'मला मुख्यमंत्री करा म्हणत दिल्लीत कोण फिरतंय?'; CM शिंदेंची ठाकरेंवर सडकून टीका
मुंबई:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Live) यांच्या दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिंदे गटातील नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. विधानसभा (Eknath Shinde Dussehra gathering in Azad Maidan) निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या दसरा मेळाव्यात प्रचाराचा नारळ फुटल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे शिवतीर्थावरील ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातही सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करण्यात आली. 

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना म्हटलं की, हिंदू बांधवांना आणि भगिनींनो म्हणायला काही लोकांना आता लाट वाटते. हिंदूहृदयसम्राट म्हणायला काही लोकांची जीभ कचरू लागली आहे. मात्र आपल्याला याची लाज नाही तर स्वाभिमान वाटतो. काही लोकांना हिंदू शब्दाची अॅलर्जी झाली आहे. मात्र हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गोरगोट्यांना आता लाज वाट आहेत. बाळासाहेबांच्या विचारांशी बेमानी करणाऱ्यांपासून आपण शिवसेना मुक्त केली.   

विरोधकांना एकनाथ शिंदे पुरुन उरला

काही लोक म्हणत होते सरकार सहा महिन्यात पडेल, वर्षात पडेल. मात्र टीकाकारांना हा एकनाथ शिंदे पुरुन उरला. ही दोन वर्ष घासून नाहीत ठासून पूर्ण केली. मी बाळासाहेबांचा, आनंद दिघेंचा चेला आहे. मी मैदानातून पळणारा नाही तर पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदान सोडत नाही. एकनाथ शिंदे जिथे जातो तिथे लोक आशीर्वाद देतात, हेच आपण कमावलं आहे. लाडक्या बहिणींचं, शेतकऱ्यांचं, सर्वसामान्यांचं हे लाडकं सरकार आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

घाबरुन घरात बसणारा मी मुख्यमंत्री नाही

आपलं सरकार राज्यात आल्यावर आपण राज्याला नंबर वन बनवलं. सहा महिन्यात राज्य पहिल्या नंबरवर आणलं याचा मला अभिमान आहे. कोरोनाला घाबरून घरात लपून बसणारा हा मुख्यमंत्री नाही. लोकांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे. सरकार बदललं नसतं तर लाखो कोटींची प्रकल्प थांबले असते, कल्याणकारी योजना थांबल्या असत्या. लाडकी बहीण योजना आली नसती, शासन आपल्या दारी आलं नसतं, असा विकासकामांचा पाढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाचला.

पहिल्या अडीच वर्षात काय झालं ते तुम्ही पाहिले. त्या अडीच वर्षात महाराष्ट्रविरोधी विकास आघाडी या सत्तेत होती. दिसेल ते काम बंद पाडण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. मेट्रोला ब्रेक, समृद्धी महामार्गाला ब्रेक, बुलेट ट्रेनला ब्रेक, जलयुक्त शिवारला ब्रेक.. जिथे नव्हता ब्रोकर तिथे लावला ब्रेकर. आम्ही सगळे स्पीड ब्रेकर उखडून टाकले आणि सरकारही उखडून टाकलं, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.

धारावी पुनर्विकास प्रकल्पात काड्या घालण्याचं काम सुरु

मुंबईच्या रस्त्यात तुम्ही पैसे खाल्ले, नालेसफाईत पैसे खाल्ले. जिथे टेंडर तिथे सरेंडर, असं त्यांचा काम होतं. मुंबईत कॉन्ट्रॅक्टरला सूट देताना लोकांचे पैसे लुटताना जनाची नाहीतर मनाची वाटायला हवी होती. तुमची 25 वर्ष मुंबईत सत्ता होती. लोकांच्या सुखदुख:शी तुम्हाला घेणेदेणे नव्हते. धारावी पुनर्विकास प्रकल्पातही काड्या घालण्याचं काम सुरु आहे. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा. मात्र धारावीकरांना तिथेच खितपड पडायला भाग पाडा. सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजेत. सर्वांचं घराचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. धारावीकरांना अफवांना बळी पडू नका. गिरणी कामगारांनाही घरे दिल्याशिवाय महायुती सरकार राहणार नाही, असा शब्दही एकनाथ शिंदे यांनी दिला.  

अन्याय सहन करुन हे बाळासाहेब म्हणून आम्ही अन्याविरुद्ध उठाव केला. आम्ही उठाव केला नसता तर सच्च्या शिवसैनिकांचा खच्चीकरण झालं असतं ही वस्तूस्थिती आहे. आपलं सरकार राज्यात आल्यावर आपण आपण राज्याला नंबर वन बनवलं. सहा महिन्यात राज्य पहिल्या नंबरवर आणलं याचा मला अभिमान आहे. आपण उठाव केला नसता तर फक्त फेसबूक लाईव्ह झालं असतं. आपण फेसबूक लाईव्हवाले नाही. आपण फेस टू फेस काम करणारे आहोत. नेता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो, असं बाळासाहेब म्हणायचे. आपण ते शिकलो, मात्र नर्मदेतील गोटे कोरडेच राहिले.

मुख्यमंत्री करा म्हणत दिल्लीत कोण फिरतंय?

मला मुख्यमंत्री करा असं म्हणत दिल्लीत कोण फिरतंय हे सगळ्यांना माहीत आहे. मला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा असे म्हणत आहेत, मात्र तुमच्या सहकाऱ्यांचा तुमचा चेहरा नकोय. तर महाराष्ट्रातील जनतेला तुमचा चेहरा कसा चालेल. महायुती सरकारचं अडीच वर्षातलं रिपोर्ट कार्ड ठेवायला मी तयार आहे. तुम्ही अडीच वर्षात काय केलं ते देखील सांगा. मग होऊ दे दूध का दूध, पाणी का पाणी. जनतेलाच ठरवू द्या. तुम्ही फेसबूक लाईव्ह शिवाय काय केलं? कोव्हिडचं कारण देऊन निष्क्रिय कारभार लपवता येणार नाही. खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही. लोक मरत होते तुम्ही तिथे पैसे मोजत होते. कुठे फेडाल हे पाप, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केली.

Previous Article
Suraj Chavan-Ajit Pawar : सूरज चव्हाणला अजित पवारांकडून मिळालं आयुष्यभर लक्षात राहील असं गिफ्ट
Eknath Shinde : 'मला मुख्यमंत्री करा म्हणत दिल्लीत कोण फिरतंय?'; CM शिंदेंची ठाकरेंवर सडकून टीका
Uddhav Thackeray criticizes eknath shinde PM modi amit shah at Dussehra melava in shivaji park
Next Article
Uddhav Thackeray : 'शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्र मोदी-शाहांचा होवू देणार नाही'; दसरा मेळाव्यात ठाकरेंची शपथ