फडणवीस-देशमुख वादात नवा ट्विस्ट; निरोप देणाऱ्या 'त्या' तरुणाचा मोठा गौप्यस्फोट! 

अनिल देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यानंतर समित कदम यांनी मांडली बाजू... 

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख असा राजकीय सामना मागील काही दिवसांपासून रंगत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करण्यासाठी फडणवीस यांनी माझ्याकडे एका व्यक्तीला पाठवून दबाव टाकला होता, असा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी केला. मात्र मी असा कोणताही दबाव आणला नसल्याचं प्रत्युत्तर फडणवीस यांच्याकडून देण्यात आलं आहे. दरम्यान, ज्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी फडणवीसांकडून पाठवण्यात आल्याचा दावा अनिल देशमुखांकडून केला जात आहे, त्याच समित कदम यांनी समोर येत आपली बाजू मांडली आहे. (Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh)

'महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल देशमुख हे गृहमंत्री होते. गृहमंत्र्याला कडक सुरक्षा व्यवस्था असते. त्यामुळे देशमुख यांच्या इच्छेशिवाय मी त्यांना भेटणं शक्यच नव्हतं. अनिल देशमुख यांनीच मला बोलावून घेतलं होतं. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि तत्कालीन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून माझ्या काही अडचणी कमी होऊ शकतात, हे बघण्याची विनंती मला देशमुख यांनी केली होती,' असा दावा समित कदम यांनी केला आहे. दरम्यान, समित कदम यांच्या या दाव्यामुळे आता अनिल देशमुख यांची अडचण झाली असून ते याबाबत काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

देशमुखांनी फडणवीसांना काय चॅलेंज दिलं? 
देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांच्यावर पलटवार केल्यानंतर देशमुख यांनीही प्रसारमाध्यमांसमोर येत फडणवीसांना प्रतिआव्हान दिलं. "देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांच्याविरोधात आरोप करून प्रतिज्ञापत्र देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता. याबाबत मी काल वक्तव्य केलं होतं. मी पुराव्याशिवाय कोणतंही वक्तव्य करत नाही. मी जे काही बोललो, फडणवीसांवर आरोप केले, त्याबाबतचे माझ्याकडे पेन ड्राइव्हमध्ये पुरावे आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना काल माझ्यावर जो आरोप केला आणि सांगितले की मी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलल्याचे व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत. माझं फडणवीस यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी ते व्हिडिओ सार्वजनिक करावेत. फडणवीस यांच्याकडे माझे कोणतेही व्हिडिओ नाहीत, फक्त काहीतरी आरोप करायचे म्हणून ते तसे बोलले आहेत. मात्र माझ्यावर वेळ आल्यानंतर किंवा कोणी मला चॅलेंज केलं तर मी पेन ड्राइव्हमधील पुरावे सर्वांसमोर आणणार,' अशा शब्दांत देशमुख यांनी फडणवीसांना अप्रत्यक्षरीत्या इशारा दिला आहे.

Advertisement

नेमके प्रकरण काय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी पाठवलेला माणूस सांगलीतील मिरजेतील एनडीएच्या मित्रपक्षाचा पदाधिकारी होता, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी केला होता. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष समित कदम यांनी अनिल देशमुखांच्या अधिकृत निवासस्थानी आणि कार्यालयाला भेट दिली, पुढे समित कदम फडणवीसांचा निरोप घेऊन देशमुखांच्या भेटीला आले होते असा दावा देशमुखांनी केला आहे.

Advertisement

नक्की वाचा - भाजप नेते प्रकाश मेहतांची मोठी घोषणा, बंडखोरी करण्याचे दिले संकेत

समित कदमांचे स्पष्टीकरण
आता देशमुखांच्या आरोपानंतर समित कदम म्हणाले, मी स्वतःहून अनिल देशमुख यांना भेटायला गेलो नव्हतो. तर देशमुख यांनी मला भेटायला बोलावल्यामुळेच मी गेलो होतो. देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांना सांगून माझ्या अडचणीमध्ये काही मदत होते का, अशी विनंती अनिल देशमुख यांनी केली होती असा दावा आता समित कदम यांनी केला आहे.

Advertisement

अनिल देशमुखांचा आरोप काय?
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी दावा केला आहे की, समित कदम यांच्या संभाषणाची व्हिडिओ क्लीप असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. यासह 100 कोटींच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे अनिल देशमुखांनी फडणवीसांना त्यावेळी सांगितले होते. तसेच समित कदम देशमुखांकडे चार ते पाच वेळा गेले, असा दावा देशमुखांनी केला आहे. फडणवीसांने सांगितल्याप्रमाणे आरोप न केल्याने दुसऱ्या दिवशी इडीचा छापा आपल्यावर पडला असा देशमुख म्हणाले.