राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai : आखाती देशांतील युद्धामुळे ठप्प झालेली निर्यात, स्थानिक बाजारातील मंदावलेली मागणी आणि बाजारात झालेली मोठ्या प्रमाणातील आवक यामुळे वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) फळ मार्केटमध्ये कलिंगडाच्या किमतीला उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी साठवणुकीअभावी खराब होणारा माल व्यापाऱ्यांना थेट बाजार परिसरातच फेकून देण्याची वेळ आली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून एपीएमसी फळ मार्केटमध्ये कलिंगडाची आवक लक्षणीय वाढली आहे. राज्यातील सोलापूर, सांगली, बीड, उस्मानाबाद आदी भागांसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील उत्पादक पट्ट्यांतून मोठ्या प्रमाणात कलिंगड बाजारात दाखल होत आहे. सोमवारी एकाच दिवशी बाजारात सुमारे ७,९८० क्विंटल कलिंगडाची आवक झाल्याची नोंद झाली. अशाच प्रकारे दरदिवशी बाजारात सरासरी ५ ते ७ हजार क्विंटल कलिंगडची आवक होत आहे. वाढत्या पुरवठ्यामुळे बाजारात मालाचा साठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
युद्धामुळे कलिंगडावरही संक्रात...
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे फळांची निर्यात मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. कलिंगडाचा मोठा हिस्सा दुबईसह आखाती देशांकडे निर्यात केला जातो. सध्या ही निर्यात जवळपास पूर्णपणे ठप्प झाल्याने मोठ्या प्रमाणातील माल स्थानिक बाजारावरच अवलंबून राहिला आहे. त्यामुळे पुरवठा वाढल्याने दरांवर दबाव निर्माण झाला असून व्यापाऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय मुंबई शहरात फेरीवाल्यांवर सुरू असलेल्या कारवाईचा परिणाम किरकोळ विक्रीवरही होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शहरातील रस्त्यांवर आणि चौकात फेरीवाले मोठ्या प्रमाणात कलिंगडाची विक्री करतात. मात्र कारवाईनंतर त्यांची संख्या कमी झाल्याने घाऊक बाजारातून मालाची उचल मंदावली आहे. परिणामी बाजारात आलेला माल गोदामात पडून राहण्याचे प्रमाण वाढले आहे.
कलिंगड बाजारात फेकून दिले...
कलिंगड हा लवकर खराब होणारा माल असल्याने दीर्घकाळ साठवणूक करणे अवघड ठरते. उष्णतेमुळे काही दिवसांतच माल खराब होऊ लागतो. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी खराब होऊ लागलेले कलिंगड बाजार परिसरातच फेकून देण्याचा मार्ग स्वीकारला आहे. बाजार परिसरात फेकून दिलेल्या कलिंगडांचे ढीग दिसून येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. या परिस्थितीमुळे शेतकरी आणि घाऊक व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि बाजारातील इतर खर्च वसूल करणे कठीण होत असल्याने शेतकरीही चिंतेत आहेत. बाजारातील परिस्थिती लवकर सुधारली नाही तर पुढील काही दिवसांत दरात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत.