अजिंक्य धायगुडे, पुणे
पुण्यातील कॅम्प परिसरात स्वतःला पोलीस उपनिरीक्षक भासवून तोऱ्यात फिरणाऱ्या एका 25 वर्षीय तोतया महिला पोलिसाला लष्कर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका नामांकित रुग्णालयात डॉक्टरांवर प्रभाव पाडण्यासाठी किंवा भेट घेण्यासाठी या संशयित महिलेने हुबेहूब पोलिसाची वर्दी परिधान केली होती. मात्र, एका खऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या तीक्ष्ण नजरेमुळे या तोतया महिलेचा संपूर्ण डाव उधळला गेला.
संशयित महिला म्हाळुंगे येथील रहिवासी
लष्कर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयित तोतया महिला पोलिसाचे नाव समिना आस्तिक इनामदार उर्फ समिना आलू पठाण असे आहे. समिना हिने खाकी वर्दी, खांद्यावरील स्टार आणि पोलिसांचे सर्व अधिकृत मानचिन्ह असलेला गणवेश बेकायदेशीररित्या परिधान केला होता.
'नेमप्लेट'मुळे फुटले बंड
समिना इनामदार ही पोलीस उपनिरीक्षकाच्या गणवेशात तिथे डॉक्टरांची भेट घेण्यासाठी आली होती. त्याच वेळी तिथे काही अधिकृत कामासाठी वैद्यकीय तपासणी करायला गेलेले सहाय्यक फौजदार महेश शिंदे हे देखील उपस्थित होते.
महेश शिंदे यांनी जेव्हा त्या महिला अधिकाऱ्याकडे पाहिले, तेव्हा त्यांना तिच्या गणवेशावर लावलेली 'नेमप्लेट' चुकीच्या पद्धतीने लावल्याचे दिसून आले. पोलीस खात्यातील शिस्तीनुसार गणवेशावरील प्रत्येक गोष्ट ठराविक ठिकाणीच असावी लागते. नेमप्लेटच्या या चुकीमुळे सहाय्यक फौजदार शिंदे यांच्या मनात तात्काळ संशयाची पाल चुकचुकली.
संशय आल्याने सहाय्यक फौजदार महेश शिंदे यांनी अत्यंत चाणाक्षपणे तिच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. "तुम्ही कोणत्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहात?" असे विचारले असता, तिने आपण 'बाणेर पोलीस ठाण्यात' कार्यरत असल्याचे सांगितले.
तिच्या उत्तरावर पूर्ण विश्वास न बसल्याने शिंदे यांनी तात्काळ लष्कर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात बोलावून घेतले. महिला पोलिसांनी समिनाची कसून चौकशी केली आणि तिच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. पोलिसांच्या कडक चौकशीसमोर समिनाची भंबेरी उडाली आणि ती पोलीस खात्यात नसल्याचे, म्हणजेच पूर्णपणे खोटे बोलत असल्याचे उघड झाले.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
आपण पोलीस नसतानाही लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि पोलिसांचा रुबाब दाखवण्यासाठी हा बनावट गणवेश परिधान केल्याची कबुली तिने दिली. लष्कर पोलिसांनी समिना इनामदार हिला तात्काळ ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास आता पोलीस करत आहेत.