Tukaram Mundhe: ज्या इमारतीतून मुंबई चालते, तिथेच अस्वच्छता! तुकाराम मुंढेंच्या FDA नं दिला मोठा दणका

Tukaram Mundhe News: एका ताकाच्या पेल्यात थेट माशी सापडल्याची तक्रार आल्यानंतर एफडीएच्या पथकाने तडकाफडकी धाड टाकत हे कँटीन सील केले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Tukaram Mundhe News: एफडीएच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तब्बल 5 तास सखोल पाहणी केली.
मुंबई:

Tukaram Mundhe News: सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता थेट मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावरच मोठा दणका दिला आहे. ज्या इमारतीतून संपूर्ण मुंबई शहराचा कारभार हाकला जातो, त्याच मुख्यालयातील कँटीनमध्ये स्वच्छतेचा आणि अन्नाच्या सुरक्षेचा पुरता फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. एका ताकाच्या पेल्यात थेट माशी सापडल्याची तक्रार आल्यानंतर एफडीएच्या पथकाने तडकाफडकी धाड टाकत हे कँटीन सील केले आहे.

ताकात सापडली माशी आणि सुरु झाली चौकशी

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील कँटीनमध्ये एका नागरिकाला देण्यात आलेल्या ताकाच्या ग्लासामध्ये माशी आढळून आली होती. या प्रकारानंतर एफडीएच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तब्बल 5 तास सखोल पाहणी केली. या पाहणीदरम्यान कँटीनमध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरण आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. 

Advertisement

यानंतर एफडीएने कँटीन चालवणाऱ्या कमल कॅटरर्स या ठेकेदाराला काम तत्काळ बंद करण्याची नोटीस बजावली आणि कँटीनला टाळे ठोकले. यासोबतच मुंबई पालिकेच्या आरोग्य आणि कामगार विभागाने मिळून संबंधित ठेकेदाराला 50000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

( नक्की वाचा : Tukaram Mundhe च्या आदेशाला थेट आव्हान? परवाना रद्द होऊनही सुरूय शिर्डीच्या मोठ्या दूध केंद्राचा कारभार )

तुकाराम मुंढे यांचा धडाका

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सध्या संपूर्ण राज्यभरात आणि मुंबईत अन्न सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. मुंबईतील केएम हॉस्पिटलच्या कँटीनवर झालेली कारवाई असो वा शहरातील इतर प्रसिद्ध हॉटेल्स, तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर एफडीएने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. महापालिका मुख्यालयातील कँटीनवरील कारवाई हा याच धडक मोहिमेचा एक भाग मानला जात आहे.

राज्यभरात एफडीएचे धाडसत्र

एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, 16 जुलै ते 21 जुलै दरम्यान राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तब्बल 103 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी गंभीर त्रुटी आढळलेल्या 16 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 34 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय दुग्ध व्यवसायावरही मोठी कारवाई करण्यात आली असून गोवंडी येथील एका डेअरीतून योग्य साठवणूक नसल्याने 1683 लिटर दूध जप्त करण्यात आले.

( नक्की वाचा : Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, मुंबईतील 'या' 3 प्रसिद्ध हॉटेल्सवर कोसळली कुऱ्हाड, कारण काय? )
 

लाखो रुपयांचा साठा जप्त

या विशेष मोहिमेत एफडीएने राज्यभरात एकूण 53 छापे टाकले. यामध्ये 1.44 लाख रुपये मूल्याचे 1731 लिटर दूध आणि 896 किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 5.56 लाख रुपये किमतीचा 2796.5 किलो इतर खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. दूध आणि खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी ही मोहीम पुढेही अशीच तीव्रतेने सुरु राहील आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे.
 

Advertisement