ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Tukaram Mundhe FDA action Mumbai hotels : अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) राज्यातील अस्वच्छ आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या हॉटेल्सविरोधात अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. ज्येष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी संचालकपदाची धुरा हाती घेतल्यापासून एफडीएने आपला मोर्चा ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांवर वळवला आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध 3 हॉटेल्सचे परवाने थेट रद्द करण्यात आले आहेत, तर विनापरवाना चालणाऱ्या विदर्भातील 1 प्रसिद्ध हॉटेलला टाळे ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे हॉटेल चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
कुठे केली कारवाई?
मुंबईच्या भेंडी बाजार परिसरातील प्रसिद्ध शालिमार हॉस्पिटॅलिटी या हॉटेलचा परवाना प्रशासनाकडून रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या हॉटेलला प्रशासनाने आधीच त्रुटी सुधारण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतर जेव्हा एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा जाऊन तपासणी केली, तेव्हा तिथे तब्बल 25 वेगवेगळ्या त्रुटी आढळल्या. नियमांचे उल्लंघन वारंवार होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर प्रशासनाने या हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा दणका दिला.
भेंडीबाजार येथीलच दुसरे प्रसिद्ध नूर मोहम्मदी हॉटेलही एफडीएच्या रडारवर आले आहे. या हॉटेलच्या स्वयंपाकघराची पाहणी केली असता तिथे अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर आल्या. स्वयंपाकघरातील जमिनीवर काळ्या तेलाचे जाड थर साचले होते, तर कबाब विभागाजवळ उघड्या असलेल्या खिडक्यांमुळे तिथे कीटक आणि मुंग्या-किड्यांचा मुक्त वावर सुरू होता.
( नक्की वाचा : Tukaram Mundhe च्या आदेशाला थेट आव्हान? परवाना रद्द होऊनही सुरूय शिर्डीच्या मोठ्या दूध केंद्राचा कारभार )
भिंती आणि छतावरील रंग उडाला होता आणि त्यावर तेलाचे थर जमा झाले होते. कच्च्या मालाची साठवणूक अस्वच्छ जागेत केली जात होती, तसेच पुरवठादारांच्या नोंदीही ठेवल्या नव्हत्या. जुनी व अस्वच्छ भांडी वापरणे, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या नोंदी नसणे आणि कीटक नियंत्रणासाठी आवश्यक ड्रेनेज व्यवस्था नसणे अशा गंभीर बाबी आढळल्याने या हॉटेलवर कारवाई करण्यात आली.
उमरखाडी येथील मे. रहमानिया रेस्टॉरंट या तिसऱ्या हॉटेलवरही अशीच कडक कारवाई करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये अन्नपदार्थ, रसायने आणि पॅकेजिंग साहित्याच्या साठवणुकीसाठी पुरेशी व्यवस्था नव्हती. हॉटेलच्या दरवाजांना कीटकप्रतिबंधक जाळ्या नव्हत्या, तसेच स्वयंपाकासाठी गंजणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्यापासून बनवलेली उपकरणे वापरली जात होती.
भिंती आणि छताचे प्लास्टर निखळले होते आणि रंगही उडाला होता. याशिवाय अन्नपदार्थांच्या आवश्यक चाचण्यांच्या नोंदी नसणे आणि पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची चाचणी न करणे अशा गंभीर त्रुटी या रेस्टॉरंटमध्ये आढळून आल्या.
( नक्की वाचा : Dombivli News: डॉक्टर मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट! रमेश म्हात्रेचा जामीन मंजूर कसा झाला? वाचा Inside Story )
विनापरवाना चालणाऱ्या अमरावती दरबार हॉटेलला नोटीस
मुंबईबाहेर अमरावती येथील शेगाव नाका, अभियंता भवन परिसरातील अमरावती दरबार या हॉटेलवर चौथी मोठी कारवाई करण्यात आली. हे हॉटेल कोणत्याही वैध अन्न परवान्याशिवाय (Food License) सर्रासपणे चालवले जात असल्याचे तपासणीत उघड झाले. नियमांचे हे अत्यंत गंभीर उल्लंघन असल्याने एफडीएने या आस्थापनाला आपला व्यवसाय तातडीने बंद करण्याचे आदेश देत थेट नोटीस बजावली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा कोणत्याही हॉटेलची गय केली जाणार नसल्याचा इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world