जाहिरात

Bhiwandi FDA Action: भिवंडीत FDA ची मोठी कारवाई! विनापरवाना चालणाऱ्या कॉस्मेटिक्स कारखान्यावर छापा

Bhiwandi News: अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बनावट आणि मानकांशिवाय बनवल्या जाणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांविरोधात आक्रमक मोहीम उघडली आहे.

Bhiwandi FDA Action: भिवंडीत FDA ची मोठी कारवाई! विनापरवाना चालणाऱ्या कॉस्मेटिक्स कारखान्यावर छापा

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बनावट आणि मानकांशिवाय बनवल्या जाणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांविरोधात आक्रमक मोहीम उघडली आहे. भिवंडीतील माणकोली-दापोडे भागातील हरीहर कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या 'सिग्मा लाईफस्टाईल प्रा.लि.' या कारखान्यावर एफडीएच्या पथकाने अचानक छापा टाकून 1 कोटी 23 लाखांहून अधिक किमतीचा कच्चा व पक्का माल आणि यंत्रसामग्री जप्त केली आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी या उत्पादनांवर 'सल्फेटमुक्त आणि पॅराबेनमुक्त' असा खोटा मजकूर आणि अंधेरी येथील बनावट पत्ता छापण्यात आला होता.

कोणताही वैध परवाना नाही 

कारखान्याकडे उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना नव्हता. बाहेर कोणताही नामफलकही लावण्यात आला नव्हता. कारखान्यात कोणत्याही प्रकारची गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळा किंवा चाचणी अभिलेख आढळले नाहीत. वस्तूंच्या खोक्यांवर बॅच क्रमांक आणि कायदेशीर माहिती गायब होती. ऑनलाईन बाजारात विक्री करण्यासाठी अंधेरीचा बनावट पत्ता वापरला जात होता. कारवाईत क्रीम फिलिंग यंत्र, श्रिंक रॅपिंग यंत्र, लेबलिंग यंत्र, ऑटोमॅटिक पावडर फिलिंग यंत्र, एअर कॉम्प्रेसर, वजन काटे आणि जनरेटर जप्त करण्यात आले.

लहान मुलांच्या उत्पादनांचाही समावेश

जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये लहान मुलांच्या रोजच्या वापरातील वस्तू आणि पुरुषांच्या पर्सनल केअर प्रॉडक्ट्सचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. यामध्ये बेबी लोशन, बेबी पावडर, बेबी वॉश, साबन आणि बेबी मसाज ऑईल,  हेअर केअर किट, बॉडी केअर हॅम्पर, शॅम्पू, हेअर सिरम, सनस्क्रीन, हेअर ऑईल, कंडिश्नर, क्रीम, रिपेलेंट, बॉडी वॉश, डँड्रफ कंट्रोल शॅम्पू, हेअर जेल, फेस वॉश, SPF 50+ हेअर स्प्रे आणि परफ्यूम यांचा समावेश होता.

या प्रकरणी एफडीएच्या तक्रारीवरून संबंधित कारखान्यातील जबाबदार व्यक्तींविरोधात भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com