रिजवान शेख, प्रतिनिधी
Mumbai News : मुंबईतील 113 वर्ष जुना आणि ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल (Elphinstone Bridge) १२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यानंतर आज ४ एप्रिल रोजी मध्यरात्री अंतिम पाडकाम मध्य रेल्वेच्या माध्यमातून केले जाणार आहे. प्रभादेवी पुलाचे पाडकाम अंतिम टप्प्यात आहे. आता मध्य रेल्वे मार्गावरील शेवटचे पॅनल काढल्यावर नवीन पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे.
प्रभादेवी पुलाच्या पाडकामुळे अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाडी दादर मार्ग आणि भायखळा मार्गे जाणार आहे. प्रभादेवी पुलाचे मध्य रेल्वे भागातील पॅनल काढण्यासाठी शनिवारी रात्री १०.३० वाजल्यापासून ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. शेवटचा आणि मुख्य ब्लॉक काढण्याचे काम शनिवारी रात्री ११:३० वाजता सुरू होणार असले तरी ओव्हर हेड वायर हटविण्यासाठी संपूर्ण मार्गिका १ तास आधी बंद ठेवणे आवश्यक असल्याचं म्हटल जात आहे. त्यामुळे सीएसएमटी ते दादर रेल्वेस्थानक दरम्यानच्या उपनगरीय सेवा पूर्णपणे बंद राहतील.
पूर्व आणि पश्चिम मुंबईतील वाहतूक कोंडी होणार
मुंबईतील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा ११३ वर्ष जुना ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल (1913 मध्ये निर्मित) आज रात्री (एप्रिल २०२६ च्या सुरुवातीस) अंतिम पाडकामानंतर इतिहासजमा होत आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर (परेल-करी रोड) हे काम होणार असून या ठिकाणी MMRDA द्वारे डबल-डेकर उड्डाणपूल उभारला जाणार आहे. हा उड्डाणपूल शिवडी-वरळी कनेक्टरला जोडला जाईल. गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री (१२:३० ते पहाटे ४:३०) रेल्वे ट्रॅकवरील पुलाचे शेवटचे भाग पाडले जातील. या जुन्या पुलाच्या जागी ४.५ किमीचा अत्याधुनिक डबल-डेकर उन्नत मार्ग बांधला जात आहे, ज्यामुळे पूर्व आणि पश्चिम मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल अशी आशा आहे. १९१३ मध्ये 'ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे' (GIPR) ने हा पूल बांधला होता. यातील ऐतिहासिक बेसाल्ट दगड जतन केले जातील.
मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम
पुलाच्या अंतिम पाडकामामुळे कामामुळे उपनगरीय आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून गाड्या दादर/भायखळा मार्गे वळवल्या जातील. नवीन पूल तयार झाल्यावर दक्षिण मुंबईतील प्रवाशांना वरळी आणि वांद्रे-वरळी सी-लिंककडे जाणे सोपे होईल, असे हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीत नमूद आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी MRIDC (महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम) काम करत आहे. ज्याचं काम २०२६ च्या अखेरीस पूर्ण होण्याचं उद्दिष्ट आहे.