Shirdi News : शिर्डीत बाबांच्या दर्शनासाठी येताना ही चूक अजिबात करू नका! भाविकांच्या लुटीचा नवा फंडा

शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना संमोहित केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Shirdi News : दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीत साई बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातील भाविक बाबांच्या दर्शनाला येत असतात. मात्र या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे. शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना संमोहित करून जडी-बुटीच्या नावाखाली आर्थिक लूट करणाऱ्या भामट्यांच्या टोळीचा ग्रामस्थांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका भाविकाची तब्बल १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डी परिसरातील रस्त्याच्या कडेला काही संशयित इसम जडीबुटी सदृश औषधी वस्तू घेऊन बसलेले असतात. साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर लक्ष ठेवून एकटे, वृद्ध अथवा भावनिक अवस्थेतील भाविक हेरले जाते. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या अंधश्रद्धा, चमत्कार, आजार बरे होण्याचे दावे करत बोलण्यात गुंतवून संमोहनासारख्या प्रकारातून फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे.

शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर...

या टोळीने एका भाविकाला जडीबुटीच्या माध्यमातून डोक्यावरील टक्कल जावून केस येतील, नशीब बदलेल, घरातील अडचणी दूर होतील, असे सांगत विश्वासात घेतले. त्यानंतर वेगवेगळ्या बहाण्याने त्याच्याकडून रोख रक्कम उकळत १० हजार रुपयांची जडीबुटी पावडरची फुडी दिली.. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित भाविकाने शिर्डी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, संशयास्पद हालचाली लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी तसेच पोलिसांनी साईकृपा आयुर्वेदिक येथिल चौघांवर गुन्हा केला आहे. या घटनेमुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दररोज लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असताना, अशा भामट्यांच्या टोळ्या सक्रिय असणे ही गंभीर बाब मानली जात आहे.

नक्की वाचा - Shirdi News : ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी शिर्डीत धक्कादायक प्रकार, जमावाकडून व्यक्तीला जबर मारहाण

शिर्डी पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. भाविकांनी अंधश्रद्धा, चमत्कार किंवा जडीबुटीच्या आमिषाला बळी न पडता सावध राहावे, तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article