गणेश मंडळांसाठी खूशखबर! मंडप उभारणीबाबत महापालिकेचा मोठा निर्णय

मंडप उभारण्यासाठी 6 ऑगस्ट 2024 पासून एक खिडकी योजनेनुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी देण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

सार्वजनिक गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सरकारच्या निर्णयानुसार गेली 10 वर्षे  नियमांचे व कायद्याचे पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग पाच वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मागील 10 वर्षात सर्व नियम कायद्याचे पालन केले आहे. त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही, असे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे. मात्र असे असले तरी दरवर्षी परवानगी नूतनीकरण करणे गरजेचे असेल. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

मंडप उभारण्यासाठी  6 ऑगस्ट 2024 पासून एक खिडकी योजनेनुसार सार्वजनिक  गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी देण्यात येणार आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनानुसार  यंदाच्या गणेशोत्सवासाठीचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात येत आहे.  गणेशोत्सवाला 7 सप्टेंबर पासून सुरूवात होत आहे. हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी  महानगरपालिका सातत्याने विविध स्तरावर प्रयत्न करत आहे. यंदा महानगरपालिका प्रशासनाने उत्सवादरम्यान विविध स्तुत्य उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना यावर्षीपासून सलग पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात येणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, मोठं कारण आलं समोर

एक खिडकी योजनेद्वारे प्राप्त अर्जांची विभागीय कार्यालयाकडून छाननी करण्यात येईल त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशन व वाहतूक पोलीस विभागाचे 'ना हरकत प्रमाणपत्र' ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करून संबंधित नियमांनुसार मंडपासाठी परवानगी देण्यात येणार आहे. यंदा नव्यानेच सार्वजनिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी देण्यात येणारी मंडप उभारण्याची परवानगी ही या वर्षासाठीच मर्यादित असेल. 

ट्रेंडिंग बातमी -  कोल्हापूर ते पॅरिस, जग जिंकणाऱ्या मराठमोळ्या स्वप्निलची 'अनटोल्ड स्टोरी'

यंदाच्या गणेशोत्सवाचे वेगळेपण म्हणजे मुंबई कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी सलग पाच वर्षांकरिता परवानगी देण्यात येणार आहे. तसेच या मंडळांना दरवर्षी या परवानगीचे नूतनीकरण करावे लागणार आहे. या नुतनीकरणात वाहतूक आणि स्थानिक पोलिसांची परवानगी प्राप्त करणे आवश्यक असेल. याशिवाय खासगी जागेवर परवानगी प्राप्त झालेल्या मंडळांना उत्सवापूर्वी विहित कालावधीत जागामालक अथवा सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस यांची परवानगी प्राप्त करून घेणे आवश्यक असेल.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर; देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

सार्वजनिक जागेवरील गणेशोत्सव मंडपाकरिता 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर  6 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.  
यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर > For Citizen > Apply > Pandal (Ganpati/Navratri) या लिंकवर जाऊन अर्ज सादर करता येईल.  

Advertisement