Pune News : पुण्यातील 'या' भागात 2 बिबट्यांचा वावर, एक जेरबंद, दुसरा कुठे फिरतोय? थरकाप उडवणारा व्हिडीओ

पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नारायणगाव परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Leopard Video
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune Leopard Video Viral : पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अशातच जुन्नर तालुक्यातील नारायणगावजवळील नारायणवाडी परिसरातही बिबट्यांचा वावर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दोन बिबटे या परिसरात फिरत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर आज सकाळी वनविभागाने पिंजरा लावून एका बिबट्याला जेरबंद केलं. या बिबट्याने परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना फस्त केल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती.वनविभागाने परिसरात पिंजरा लावून सापळा रचला होता.त्यामध्ये आज सकाळी एक बिबट्या अडकला. दुसरा बिबट्या अद्यापही परिसरात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून वनविभागाकडून त्याचा शोध सुरू आहे. 

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव,खेड आणि शिरूर या भागांमध्ये बिबट्यांचा वावर सातत्याने वाढत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विशेषतः ऊसतोडीनंतर ऊसाच्या शेतांमधील आश्रयस्थान नष्ट झाल्यामुळे बिबटे विविध गावांच्या परिसरात स्थलांतरित होत असल्याचे वनविभागाची माहिती आहे. गेल्या काही काळात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे जीवितहानीची मोठी घटना घडली नसली, तरी पाळीव प्राण्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात संध्याकाळनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून अनेक ठिकाणी‘लॉकडाऊन'सारखी परिस्थिती दिसून येत आहे.

माणिकडोह बिबट निवारा केंद्रावर वाढता ताण

जुन्नरमधील माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे पकडण्यात आलेल्या बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उपलब्ध माहितीनुसार या परिसरातून आतापर्यंत 100 हून अधिक बिबटे पकडण्यात आले आहेत.अलीकडेच या केंद्रातून 20 बिबटे (10 नर व 10 मादी) गुजरातमधील वनतारा वाईल्डलाईफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिएशन सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात आले.तरीही या केंद्रावर बिबट्यांचा ताण कायम आहे.

Advertisement

नवीन निवारा केंद्राची उभारणी

माणिकडोह येथील विद्यमान केंद्र कमी पडत असल्याने त्याच्या शेजारीच सुमारे 2 ते 2.5 एकर क्षेत्रावर नवीन बिबट निवारा केंद्र उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.मात्र तोपर्यंत पकडण्यात येणाऱ्या बिबट्यांना उपलब्ध पिंजऱ्यांमध्येच ठेवावे लागत आहे.सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या बिबट्यांना पिंजऱ्यांमध्येच वाढत्या तापमानात ठेवावे लागत असल्याने वनविभागासमोर व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

अन्नपुरवठ्याचाही प्रश्न

पकडलेल्या बिबट्यांसाठी दररोज मोठ्या प्रमाणात मांसाची आवश्यकता असते.हे मांस जवळच्या जुन्नर शहरातून आणावे लागते.त्यामुळे अन्नपुरवठा,देखभाल आणि व्यवस्थापनाचा खर्च वाढत असल्याचे वनविभागाकडून सांगितले जाते.

Advertisement
  • उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे काही महत्त्वाचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत 
  • बिबट्यांच्या नसबंदीचा (Sterilization) प्रस्ताव प्रलंबित
  • पकडलेल्या बिबट्यांचे पुनर्वसन कुठे करायचे हा प्रश्न
  • वाढत्या बिबट्यांच्या संख्येवर कायमस्वरूपी उपाययोजना नाहीत
  • ग्रामीण भागात मानव-बिबट संघर्ष वाढण्याची भीती

या सर्व पार्श्वभूमीवर बिबट्यांच्या वाढत्या संख्येचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने दीर्घकालीन आणि ठोस धोरण राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि रात्री एकटे बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.