जाहिरात

Pune News: वडिलांच्या सुटकेसाठी दिला लढा, आता सांभाळणार पुण्याची धुरा, नव्या महापौरांचा काळजाला भिडणारा प्रवास

Pune New Mayor 2026: पुण्याच्या नव्या महापौर मंजुषा नागपुरे यांचा हा प्रवास एखाद्या चित्रपटाला शोभेल असा आहे.

Pune News: वडिलांच्या सुटकेसाठी दिला लढा, आता सांभाळणार पुण्याची धुरा, नव्या महापौरांचा काळजाला भिडणारा प्रवास
Pune News: कुवेत युद्धाच्या झळा सोसलेल्या एका कुटुंबातील मुलगी आज पुण्याच्या प्रथम नागरिक बनली आहे.
पुणे:

Pune New Mayor 2026: पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा नागपुरे यांची 9 फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवड झाली आहे. एका बाजूला राजकीय यश दिसत असले तरी, या यशामागे प्रचंड संघर्षाचा आणि जिद्दीचा मोठा इतिहास दडलेला आहे. मंजुषा नागपुरे यांचा हा प्रवास एखाद्या चित्रपटाला शोभेल असा असून, कुवेत युद्धाच्या झळा सोसलेल्या एका कुटुंबातील मुलगी आज पुण्याच्या प्रथम नागरिक बनली आहे. त्यांचा हा प्रवास केवळ एका राजकीय नेत्याचा नसून तो संकटांवर मात करणाऱ्या एका कणखर महिलेचा आहे.

कुवेत युद्धाचा तो थरार आणि कुटुंबावर ओढवलेले संकट

मंजुषा नागपुरे यांचा जन्म 1979 मध्ये धुळे जिल्ह्यातील थांद या गावी झाला. त्यांचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते आणि कामानिमित्त कुवेतला गेले होते. 80 च्या दशकाच्या शेवटी नागपुरे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. मात्र 1990 च्या सुमारास इराक-कुवेत युद्ध सुरू झाले आणि नागपुरे कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. त्यांचे वडील कुवेतमध्ये अडकले आणि अचानक त्यांचा संपर्क तुटला. घरातील कमावती व्यक्ती परदेशात अडकल्यामुळे आणि त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

(नक्की वाचा : Pune News: आता थेट उड्डाणपुलावरून धावणार पुणे मेट्रो; नगर रोडचा प्रवास होणार सुसाट! वाचा सर्व माहिती )
 

संघर्षाचे दिवस आणि शिक्षणाची जिद्द

वडील बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबाची आर्थिक ओढताण सुरू झाली. नातेवाईकांनीही पाठ फिरवली होती. अशा परिस्थितीत मंजुषा नागपुरे यांच्या आईने दागिने विकून मुलांचे पालनपोषण केले. परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांच्या थोरल्या बहिणीला शिक्षण सोडावे लागले.

 मात्र, मंजुषा नागपुरे अभ्यासात हुशार असल्याने त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी 1995-96 च्या दरम्यान स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेण्यास सुरुवात केली. आईची जिद्द आणि स्वतःची मेहनत या जोरावर त्यांनी संकटातही हार मानली नाही.

( नक्की वाचा : Pune News: पुणे स्टेशनवर आता नो गर्दी, नो गोंधळ, रेल्वे प्रशासनाचा मोठा 'गेम चेंजर' प्रकल्प! वाचा सविस्तर )

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वडिलांचे पुनरागमन

आपल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी नागपुरे कुटुंबाने राष्ट्रपती आणि पंतप्रधानांपर्यंत पत्रव्यवहार केला होता. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांचे वडील सुखरूप घरी परतले. तो क्षण आठवताना नागपुरे आजही भावूक होतात. त्यांचे वडील अनेक वर्षे एकांतवासात राहिल्यामुळे सुरुवातीला बोलण्याच्या स्थितीत नव्हते. 

'टाईम्स नाऊ' नं याबाबत वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार मंजुषा नागपुरे यांच्या वडिलांवर उपचार करण्यात आले आणि हळूहळू ते सावरले. वडिलांच्या परतण्याने कुटुंबाला पुन्हा उभारी मिळाली आणि मंजुषा नागपुरे यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण करत व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी (Post Graduation) संपादन केली.

राजकीय प्रवास आणि महापौरपदाची जबाबदारी

मंजुषा नागपुरे यांनी 2012 मध्ये भाजपच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी सिंहगड रस्ता परिसरात नगरसेविका म्हणून उत्तम काम केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही त्या सक्रिय होत्या. नुकत्याच झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 165 पैकी 119 जागा जिंकून भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले होते. महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी, तर परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com