Mumbai News : मुंबईतील नेव्ही नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका कर्तव्यावर असलेल्या 'अग्निवीर' जवानाच्या हातातून भरलेली रायफल चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. या रायफलमध्ये तीन मॅगझिन आणि 40 राऊंड्स होते. नौदलाच्या शीघ्र कृती दलाच्या वेशात आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने ही चोरी केली असून, तो रायफलसह फरार झाला आहे, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने जवानाला जेवणाची वेळ झाली असल्याचे सांगून त्याला रिलिव्ह करण्याचा बनाव केला. त्यानंतर त्याने जवानाच्या हातातील इन्सास रायफल ताब्यात घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळानंतर, जवानाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्याने तातडीने वरिष्ठांना याची माहिती दिली.
(नक्की वाचा- Pune News: ठिकठिकाणी वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण, ईद-ए-मिलाद मिरवणुकीत डीजेचा दणदणाट)
नौदल आणि पोलिसांकडून तपास सुरू
रायफल चोरीची घटना समोर आल्यानंतर पोलीस आणि नौदल दोघेही सतर्क झाले आहेत. कफ परेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. पोलिसांसोबतच नौदल देखील या घटनेचा समांतर तपास करत आहे.
एका सैनिकाच्या हातातून भरलेली रायफल चोरीला जाणे ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. सध्याच्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांना गांभीर्याने घेतले जात आहे. चोरलेला व्यक्ती नौदलाच्या वेशात असल्याने, ही घटना पूर्वनियोजित असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.
(नक्की वाचा- Mumbai Local Train Ticket: QR कोडद्वारे तिकीट बुकींग सेवा स्थगित, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय)
'ह्युमन बॉम्ब' स्फोटाच्या धमकीने खळबळ
मुंबईत अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर 'ह्युमन बॉम्ब' स्फोट घडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला होता. 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले असून त्यांच्याजवळ 400 किलो आरडीएक्सच्या असून मोठा स्फोट घडवण्याचा त्यांचा डाव असल्याचा धमकीत म्हटलं होतं. त्यामुळे या धमकीच्या पार्श्वभूमीवर नेव्ही नगरमधील घटना चिंताजनक बनली आहे.