अविनाश पवार, पुणे
टीव्ही मालिका बघताना अनेकदा कार्यक्रम कमी आणि जाहिराती जास्त असा अनुभव येतो. मात्र आपल्या मर्जीने आपण ती मालिका बघत असल्याने त्या जास्तीच्या जाहिरातींवर आक्षेप घेणेही शक्य नसते. मात्र एका ज्येष्ठ महिलेने सुप्रिया सुळे यांच्याकडे याबाबत अजब मागणी केली आहे. टीव्ही मालिकांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या अत्याधिक जाहिरातींमुळे आपली होणारी गैरसोय आजींनी थेट सुप्रिया सुळेंना सांगितली आणि यावर काहीतरी करण्याची विनंती केली. पिंपरी-चिंचवड शहरात नियोजित बैठकीसाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सुप्रिया सुळे शहरात एका बैठकीसाठी आल्या असताना, एका आजींनी त्यांची भेट घेतली. ही भेट सामान्य समस्यांवर चर्चा करण्यासाठी असेल असे वाटत असतानाच, आजींनी त्यांच्यासमोर टीव्ही मालिकांच्या वेळेतील एक समस्या मांडली.
"आम्ही जाहिरात पाहण्यासाठी पैसे भरतो का?"
आजींनी सुप्रिया सुळे यांना सांगितले की, माझा मुलगा आणि सून कामाला जातात. मी घरी असल्याने टीव्हीवर मालिका बघत असते. पण मालिका पाहताना त्यांना येणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी तक्रार केली. मालिका 30 मिनिटांची असते, पण त्यामध्ये जवळपास 20 मिनिटांच्या जाहिरातीच असतात. आम्ही काय जाहिरात पाहण्यासाठी पैसे भरतो का? एक जाहिरात दोन-तीन वेळेला दाखवतात आणि मालिका थोडीच दाखवतात. ताई, यावर तुम्ही काहीतरी करा. एवढे पैसे आम्ही भरतो, जाहिरातच बघायची का?" असं त्यांनी सुप्रिया सुळेंना सांगितलं.
आजींनी अत्यंत साधेपणाने आणि स्पष्टपणे मांडलेल्या या मागणीमुळे सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत असलेले इतर नेते देखील हसू आवरू शकले नाहीत. सुप्रिया सुळेंनी आजींचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. तुम्ही तक्रार करून चांगलं केलंत', असे म्हणत सुप्रिया सुळे यांना काहीतरी करता येईल असं आश्वासन देखील दिलं.