
Ganesh Chaturthi 2025 : आज आणि उद्या दोन दिवस गणेश मूर्ती, सजावट खरेदी आणि प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त मोठी गर्दी होते. गणेश भक्त आणि मंडळे श्रींची मूर्ती आणि सामान खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असतात. गणेश मूर्ती विक्रीचे बहुसंख्य स्टॉल डेंगळे पूल ते शिवाजी पुलाचे दरम्यान श्रमिक भवन समोर (आण्णाभाऊ साठे चौक) कसबापेठ पोलीस चौकी ते जिजामाता चौक ते मंडई, सावरकर पुतळा ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड) तसेच कुंभारवाडा, केशवनगर मुंढवा येथे आहेत. या परिसरातील नागरीकांची गैरसोय तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी या ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे राहणे गरजेचे असल्याने पोलीस उप आयुक्त, वाहतुक शाखा पुणे शहर हिंमत जाधव यांनी अत्यावश्यक सेवेतील वाहने यामध्ये फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका वगळून आवश्यकते नुसार 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान सकाळी 6.00 ते रात्री 24.00 पर्यंत आवश्यकतेनुसार वाहतूक बदलाबाबतचे पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
25 ते 27 ऑगस्ट दरम्यान पुण्यात वाहतूक मार्गात बदल l Changes in traffic routes in Pune between August 25 to 27
शिवाजी रोड : गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक वाहतूकीसाठी बंद करण्यात येत आहे. वाहन चालकांनी खालील मार्गाचा अवलंब करावा.
पर्यायी मार्ग :- गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळण घेऊन संताजी घोरपडे पथावरुन कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. शिवाजीनगरकडून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स.गो. बर्वे चौकातून डावीकडे वळन न घेता, सरळ जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. झाशी राणी चौक ते खुडे चौक ते डेंगळेपुल मार्गे कुंभारवेसकडे जाणा-या वाहन चालकांनी खुडे चौकामधून म.न.पा.पुणे समोरुन मंगला सिनेमा लेन मधुन कुंभारवेस किंवा प्रिमीयर गॅरेज चौक शिवाजीपुल मार्गे गाडगीळ पुतळा चौक डावीकडे वळन घेऊन कुंभारवेस चौक या मार्गाचा वापर करावा. सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड) नो पार्कीग, गणपती विक्री दरम्यान रस्त्याचे दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू राहील. परंतू नमुद टप्प्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाहने पार्क करु नये.
पार्किंग व्यवस्था कुठे असेल?
मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा पर्यंत, जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक रस्त्याचे डाव्या बाजूस, निलायम ब्रिज ते सिंहगड रोड जंक्शन.
केशवनगर, मुंढवा येथे 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6.00 ते 24.00 वाजेपर्यत तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे वाहतुकीमध्ये पुढील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.
एकेरी मार्ग :- छत्रपती शिवाजी महाराज चौक, केशवनगर येथून मांजरीकडे नगर संथत मंजरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी मांजरी रोडने न जाता गायरान वस्ती रोडने रेणुका माता मंदीर येथुन उजवीकडे वळून विहान सोसा रोडने मांजरी रोडकडे जावे. गायरान वस्ती येथून मुंढवा चौकाकडे येणाऱ्या वाहनचालकांनी रेणुका माता मंदिर येथून डावीकडे वळून पुढे व्यंकटेश ग्राफिक्स येथून उजवीकडे वळून मांजरी रोडवरून मुंढवा चौकाकडे जावे.
नक्की वाचा - Pune Manache Ganpati : पुण्यातील 5 मानाच्या गणपतींची मिरवणूक अन् पाणप्रतिष्ठापनेची वेळ ठरली, पाहा यादी!
पुढे दिलेल्या मार्गावरुन सर्व प्रकारच्या वाहनांकरीता (जड वाहनांना प्रवेश बंदी) एकेरी वाहतूक सुरु राहील. फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरुज, आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक, मंगला टॉकिज समोरील प्रिमीयर गॅरेज लेन मधूनकुंभारवेस.
गणेश मुर्ती खरेदीसाठी येणारे भक्त व गणपती मंडळाची वाहने न्या. रानडे पथावर कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा या दरम्यान रस्त्याचे कोर्टाकडील एका बाजूस, वीर संताजी घोरपडे पथावर म.न.पा. बिलभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौक या रस्त्याचे दक्षिण बाजूस, टिळक पुल ते भिडे पुल दरम्यानचे नदीपात्रातील रस्त्यावर, मंडई येथील मिनर्व्ह व आर्यन पार्किंग तळावर, शाहू चौक (फडगेट चौकी चौक) ते राष्ट्रभुषण चौक फक्त रस्त्याचे डावे बाजुस पार्कींग करावी.
शिवाजीनगर स्टॅण्डवरुन शिवाजीरोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या बसेस स.गो. बर्वे चौकातून शिवाजीपुलावरुन जाण्याऐवजी स.गो. बर्वे चौकामधून जंगली महाराज रोडने टिळक चौक मार्गे टिळक रोडने स्वारगेटकडे जातील. कार्पोरेशन बसस्टॉप येथून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसेस ह्या झाशीराणी चौक मार्गे जंगली महाराजरोडने अलका टॉकीज चौक, टिळक रोड / शास्त्री रोडने स्वारगेटकडे जातील. तरी वाहनचालकांनी वरील प्रमाणे करण्यात आलेल्या वाहतुक बदलांचा अवलंब करून वाहतुक सुरळीत ठेवण्यास वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उप आयुक्त, वाहतुक शाखा पुणे शहर हिंमत जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world