Palghar News: मुंबई-अहमदाबाद डहाणूजवळ टँकरमधून गॅस गळती; नागरिकांची अंगाला खाज सुटल्याने पळापळ

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूजवळ टँकरमधून गॅस गळती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गळतीमुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास आणि अंगाला खाज सुटण्याचे प्रकार समोर येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू येथील चारोटी नाक्याजवळ एका टँकरमधून रसायनाची गळती सुरू झाल्याने मोठी खळबळ उडाली. सोडियम क्लोराईडची वाहतूक करणाऱ्या या टँकरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही गळती सुरू झाली. वाऱ्यासोबत हे रसायन पसरल्याने महामार्ग आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

नागरिकांना श्वसनास त्रास आणि खाज

टँकरमधून होणाऱ्या गळतीमुळे परिसरात उग्र वास पसरला आहे. या गॅससदृश धुरामुळे प्रवाशांना आणि चारोटी नाक्यावरील स्थानिक नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे. तसेच, अनेकांनी शरीराला प्रचंड खाज सुटत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य पाहून नागरिकांमध्ये पळापळ सुरू झाली होती.

Advertisement

(नक्की वाचा-  Dadar Railway Station: दादर स्थानकात मोठा बदल होणार, प्लॅटफॉर्म क्रमांकही बदलणार)

अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी तात्काळ धाव घेत महामार्गावरील वाहतूक नियंत्रित केली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून रसायनावर पाण्याचा फवारा मारून गळती रोखण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

वाहतुकीत बदल

खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणारा चारोटी नाक्यावरील सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. मुख्य महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असली तरी, प्रवाशांना या भागातून जाताना काचा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

(नक्की वाचा- TCS Nashik Case: वरिष्ठांचा छळ आणि लैंगिक शोषण का सहन केलं? एका पीडितेबाबत मन सुन्न करणारी माहिती समोर)

पालघर जिल्हा प्रशासनाने चारोटी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा आणि त्रास जाणवल्यास तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.
 

Topics mentioned in this article