Satara latest News : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळाल. राज्यभरात बिबट्यांनी दहशत माजवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. महाबळेश्वरमध्येही बिबट्यानं शिरकाव केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. परंतु, आता जंगली प्राणी गव्यानं साताऱ्यातील फलटण तालुक्यातील विडणी गावात धुमाकूळ घातला आहे. कोकरेवाडी परिसरात आज सकाळी जंगली गव्याने थेट वस्तीमध्ये घुसून एका ग्रामस्थावर हल्ला चढवला. राजेंद्र सदाशिव जाधव असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील विडणी येथील कोकरेवाडी परिसरात आज सकाळी जंगली गव्याने थेट वस्तीमध्ये घुसून धुमाकूळ घातला. हा गवा अत्यंत आक्रमक असून तो नागरिकांच्या दिशेने धावून त्यांच्यावर हल्ला चढवतो. त्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. गव्याच्या हल्ल्यात राजेंद्र सदाशिव जाधव जखमी झाले असून त्यांच्यावर बारामती येथे उपचार सुरू आहेत.
नक्की वाचा >> Video : फॉरेनर महिलेसमोर देशाचं नाक कापलं..सेल्फीसाठी केलं नको ते कृत्य, मुंबईचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल
'नागरिकांनी घराबाहेर पडताना एकटं फिरू नये'
आज सकाळच्या सुमारास गवा अचानक वस्तीमध्ये शिरला आणि बघता बघता त्याने जाधव यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली आणि जाधव यांना रुग्णालयात दाखल केले.जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरलं आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी. लहान मुलांना एकटे सोडू नये. तसेच शेतात जाताना समूहाने जावे,असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
— Naresh Shende (@NareshShen87640) February 27, 2026
संबंधित गवा अद्याप विडणी परिसरातच फिरत असल्याची शक्यता आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र वन विभाग यांच्या सातारा पुणे आणि बारामती येथील पथकांना पाचारण करण्यात आले असून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. गव्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यासाठी गस्त वाढवण्यात आली आहे.कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधा,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world