घाटकोपर होर्डिंग कोसळल्याच्या घटनेत मृतांचा आकडा वाढला; 14 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार?

या घटनेनंतर मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान काल 13 मे रोजी सायंकाळी अवकाळी पाऊस, तुफान वाऱ्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं. मुंबईत सायंकाळी तुफान वाऱ्यासह धुळीचे लोटही पसरले होते. यावेळी घाटकोपरच्या छेडा नगर येथील महाकाय होर्डिंग मागे असलेल्या पेट्रोल पंपावर कोसळलं. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने शंभरहून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. 

सायंकाळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या घटनेत मृतांचा आकडा वाढला असून यामध्ये तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 35 हून अधिक जणं गंभीर असल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे होर्डिंग अनधिकृत असून पालिकेने त्याला परवानगी दिली नव्हती. मात्र रेल्वेच्या हद्दीत असल्यामुळे त्याद्वारे परवानगी दिली गेली असल्याची माहिती आहे. 

नक्की वाचा - घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

या घटनेनंतर मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्या अनधिकृत होर्डिंगला परवानगी कुणी दिली? मुंबईतील इतर होर्डिंगच्या बांधकामाचं काय? असे सवाल उपस्थित केले जात आहे. हे होर्डिंग इगो मीडिया या कंपनीचं असून या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. यासोबतच मुंबईतील सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या असून अशाप्रकारच्या अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.   

भावेश भिडेंविरूद्ध गुन्हा दाखल
पंतनगर पोलीस ठाण्यात होर्डिंगचा मालक आणि इगो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक भावेश भिडेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या होर्डिंगला 2021 मध्ये परवानगी देण्यात आली होती. जवळपास दहा ते वीस वर्षांसाठी इगो मीडिया कंपनीला हे कंत्राट देण्यात आले होते. रेल्वेचे माजी पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या कार्यकाळात परवनागी देण्यात आल्याची माहिती आहे. पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्डिंगचा आकार 120x120 फूट होता. मात्र 40x40  फुटांहून अधिक आकाराचं होर्डिंग लावण्याची परवानही नाही. पालिका विभागाकडून यासंदर्भात नोटीस जारी करण्यात आल्याचंही समजते. 

Advertisement

त्या होर्डिंगसाठी झाडांवर विषप्रयोग...
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील अनधिकृत होर्डिंगबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अनधिकृत होर्डिंग दिसण्यासाठी जाहिरातदारांकडून  पूर्व द्रुतगती मार्गावरील 30 ते 40 झाडांवर विषप्रयोग केल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेचे अधिकारी घाटकोपर पेट्रोल पंपासमोरील झाडांची पाहणी करीत असताना त्यांना काही झाडे मृतावस्थेत आढळले. अचानक 30 ते 40 झाडे पूर्णपणे सुकून गेल्यामुळे विषप्रयोग केल्याचं निदर्शनास आले. उद्यान विभागाच्या माहितीनुसार, पेल्टोफोरम, सुबाभूळ आणि पिंपळ या झाडांना छिद्र पाडून त्यात विष ओतण्यात आलं. प्रत्येक झाडावर 5 ते 6 छिंद्र आढळली आहेत.  

Advertisement