मुंबईच्या कोणत्याही सब-रजिस्ट्रार कार्यालयात होणार मुंबईतल्या कुठल्याही मालमत्तेची दस्त नोंदणी

तुम्ही मुलुंडमध्ये घर खरेदी केलेत आणि तुम्ही अंधेरीचे रहिवासी असाल तर तुम्हाल दस्त नोंदणीसाठी मुलुंडच्या नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही तुम्ही दस्त नोंदणी अंधेरीच्या कार्यालयातूनही करू शकाल.  

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विकत घेतलेल्या मालमत्तेच्या दस्त नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी महसूल विभागाने एक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे. शासनाने एक गॅझेट नोटिफिकेशन अर्थात अधिसूचना जारी केली आहे ज्यात मालमत्ता नोंदणीसाठीची हद्दीची अट रद्द करण्यात आली आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास तुम्ही मुलुंडमध्ये घर खरेदी केलेत आणि तुम्ही अंधेरीचे रहिवासी असाल तर तुम्हाल दस्त नोंदणीसाठी मुलुंडच्या नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही तुम्ही दस्त नोंदणी अंधेरीच्या कार्यालयातूनही करू शकाल.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बुधवारी राज्य शासनाच्या महसूल विभागाने एक अधिसूचना जारी केली. ज्याद्वारे सगळ्या रजिस्ट्रेशन कार्यालयांचे एकीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यापुढे दस्त नोंदणी कार्यालये, मुंबई-फोर्ट, मुंबई-अंधेरी, मुंबई-कुर्ला अशी ओळखली जाणार नाही तर ती मुंबई शहरे आणि मुंबई उपनगरे अशी म्हणून ओळखली जातील. हा निर्णय सध्या फक्त मुंबई महापालिका हद्दीसाठी घेण्यात आला आहे. सध्या मुंबईमध्ये एकूण 32 उपनिबंधक कार्यालये आहेत. यातील 26 कार्यालये ही उपनगरात आहेत तर 6 कार्यालये मुंबई शहरात आहेत. या ठिकाणी मालमत्तेच्या दस्त नोंदणीसंदर्भातील कामे केली जातात. 

हे ही वाचा : मुस्लिमांना लग्न-घटस्फोटाची नोंदणी अनिवार्य

महसूल विभागाच्या या निर्णयामुळे नागरिकांचा दस्त नोंदणी कार्यालयात येण्या-जाण्याचा वेळही वाचेल आणि ही सगळी प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना एका अधिकाऱ्याने या निर्णयाबद्दल बोलताना म्हटले की, दस्त नोंदणी करत असताना मुंबईत कोणतीही हद्दीची मर्यादा नसावी असा आमचा प्रयत्न असून ही सुविधा आठवड्याभरात सुरू होईल.सद्यस्थितीत कुर्ला उपबिनंधकाच्या कार्यालयात सगळ्यात जास्त दस्त नोंदणी केली जाते. महसूल विभागाच्या नव्या निर्णयामुळे एकाच कार्यालयाला येणारे महत्त्व कमी होण्यास मदत होईल. मात्र यासाठी सरकारतर्फे आवश्यक तो कोड तातडीने जारी करण्याची गरज आहे.