पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्याना 20 हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. यंदाची आषाढी वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी नियोजन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंढरपूर तीर्थक्षेत्र आषाढी एकादशी वारी पालखी सोहळा पूर्वनियोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अथितीगृह येथे विशेष बैठक झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बैठकीत वारकरी प्रतिनिधींनी मागणी केल्यानुसार दौंड येथील भीमा नदी काठी होणारा कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. या निर्णयाचे बैठकीतच समस्त वारकरी संप्रदायाने टाळ्यांनी आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले. आषाढी वारीसाठी वारकऱ्यांसाठी गटविमा योजना लागू करण्याची, तसेच वारकऱ्यांच्या वाहनांना गतवर्षीप्रमाणेच टोल माफी देण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटलं की, आषाढी वारीसाठी गतवर्षी पंढरपुरात भेट देऊन, पाहणी करून तयारी केली होती. यंदाही चांगले नियोजन करून, आषाढ वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासनाच्या सर्वच विभागांनी चांगली तयारी केली आहे. विशेषतः अपघात टाळण्यासाठी गृह विभागाला नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
(नक्की वाचा - देशात हिंदूच्या लोकसंख्येत घट, मुसलमानांची लोकसंख्या 43 टक्के वाढली)
वारीच्या नियोजनासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती
वारीच्या नियोजनासाठी गतवर्षीप्रमाणेच मंत्रालायतून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्त केली गेली आहे. आषाढ वारीतील वारकऱ्याचा दुर्देवाने अपघात झाल्यास गटविमा मिळावा म्हणून गतवर्षीपासून विमा योजना लागू केली आहे. या योजनेची प्रभावी अमंलबजावणी व्हावी यासाठी एसओपी निश्चित केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
(नक्की वाचा - 'हलाल सर्टिफिकेट'ला हिंदू संघटनांकडून उत्तर, प्रसाद शुद्धीसाठी मिळणार ओम प्रमाणपत्र)
वारीसाठी जास्तीच्या एसटी बसेसची सुविधा
पालखी मार्ग असणाऱ्या रस्त्यांची दुरूस्तीसाठी विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे. या मार्गालगतच्या वृक्ष लागवडीसाठी संबंधित यंत्रणांना देशी वाणाची झाडे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारीसाठी जास्तीच्या एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी सक्षम आणि तज्ज्ञ यंत्रणाचा सहभाग घेण्यात येत आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, दर्शन मंडपातील हवेशीर व्यवस्था, महिलांसाठी कपडे बदलण्यासाठीची स्वतंत्र आणि पुरेशी व्यवस्था, आरोग्य सुविधा- महाआरोग्य शिबीरांचे आयोजन, रुग्णवाहिकांची पुरेशी संख्या, मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्धता या सर्व बाबींचे काटेकोर नियोजन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.