रिजवान शेख, ठाणे
ठाण्यातील दिवा-आगासन रोड परिसरातील बेडेकर नगरमध्ये एका 5 वर्षीय चिमुकलीचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाला आहे. निशा शिंदे असे मृत बालिकेचे नाव असून, महिनाभर उपचार घेऊनही तिचा जीव वाचू शकला नाही. या घटनेमुळे दिवा शहरात संतापाची लाट उसळली असून महापालिकेच्या आरोग्य विभागावर गंभीर आरोप केले जात आहेत.
नेमकी घटना काय?
निशा 17 नोव्हेंबर रोजी आपल्या घराबाहेर खेळत होती. त्याच वेळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. कुटुंबीयांनी तिला तातडीने डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे तिला आवश्यक ती रेबिज प्रतिबंधक इंजेक्शन्स देण्यात आली. 3 डिसेंबर रोजी निशाचा पाचवा वाढदिवस होता, तेव्हा तिची प्रकृती स्थिर होती. मात्र, 16 डिसेंबर रोजी चौथे इंजेक्शन दिल्यानंतर अचानक तिची प्रकृती खालावली.
कस्तुरबा रुग्णालयात मृत्यूशी झुंज अपयशी
निशाला रेबिजची लक्षणे दिसू लागल्याने डॉक्टरांनी तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, कस्तुरबा रुग्णालयात पोहोचल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली आणि उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. "सर्व इंजेक्शन्स वेळेवर देऊनही रेबिजची लक्षणे कशी दिसू शकतात?" असा संतप्त सवाल आता नातेवाईक विचारत आहेत.
(नक्की वाचा- Navi Mumbai News: अॅम्बुलन्स चालक जेवायला गेला, तरुणाचा उपचाराविनाच मृत्यू; वाशीतील घटना)
आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
ॲड. रोहिदास मुंडे यांनी प्रशासकीय आणि वैद्यकीय त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी याबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. दिलेली इंजेक्शन्स योग्य दर्जाची होती का? वैद्यकीय निरीक्षणात डॉक्टरांकडून काही चूक झाली का? दिव्यात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका प्रशासन अपयशी का ठरत आहे? असे सवाल मुंडे यांनी उपस्थित केले.
(नक्की वाचा- महायुतीत दोस्तीत कुस्ती! पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या NCP ला शह देण्यासाठी भाजप-शिंदेंची सेना एकत्र)
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
दिव्यात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, लहान मुलांचे घराबाहेर खेळणे कठीण झाले आहे. "निशाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि शहरातील कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.