- नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी
- 16 मे ते 18 मे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी
- प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात रुग्णांसाठी कोल्ड वॉर्ड तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Heatwave Alert: हवामान विभागाने नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात संभाव्य उष्णतेच्या लाटेचा (हीट वेव्ह) इशारा देत यलो अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या, विशेषतः विद्यार्थी आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. 16 मे ते 18 मे दरम्यान उष्णतेची तीव्रता अधिक राहणार असल्याने सकाळी 11 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाच्या आयोजनास परवानगी नाकारण्यात आली आहे. विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी यासंदर्भात सर्व संबंधित विभागांना सक्त निर्देश दिले आहेत.
महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि आस्थापनांना निर्देश
विभागीय आयुक्तांनी बैठकीत स्पष्ट केले की, उन्हाची तीव्रता पाहता सर्व खासगी आणि शासकीय आस्थापना, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग सेंटर्स यांनी विद्यार्थी तसेच कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या. दुपारच्या कडक उन्हात नागरिकांना बाहेर पडावे लागू नये, अशा पद्धतीने कामांचे तसेच वर्गांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोल्ड वॉर्ड तयार करण्याचे आदेश
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात तत्काळ उपाययोजना राबवण्याचे आदेश बिदरी यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (PHC) उष्माघाताच्या रुग्णांसाठी विशेष 'कोल्ड वॉर्ड' तयार करण्यात यावे. तसेच उष्माघातावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा पुरेसा साठा सदैव उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मे आणि जून या दोन्ही महिन्यांत उष्णतेचा हा अलर्ट लागू राहण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने अतिदक्षता बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.
(नक्की वाचा: Monsoon 2026 Updates: उकाड्यापासून सुटका होणार, मान्सून अंदमानात या दिवशी धडकणार; महाराष्ट्रात कधी बरसणार?)
नागपूर आणि चंद्रपुरात विशेष उपाययोजनानागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात आधीच विशेष उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले की, शहरातील प्रमुख चौकांमध्ये नागरिकांना सावली मिळावी यासाठी 'ग्रीन नेट' लावण्यात आल्या आहेत. सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक त्या सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या असून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Photo Credit: NDTV Marathi
उपाययोजना 16 जूनपर्यंत राहणार लागूनागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत माहिती दिली की, नागपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावर सर्व आवश्यक उपाययोजना लागू करण्यात आल्या असून, या उपाययोजना येत्या 16 जूनपर्यंत कायम राहतील.
सर्वसामान्य जनतेने दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नये आणि उष्माघाताची लक्षणे दिसताच जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये गरजू लोकांसाठी 'सेंटर होम' यासारख्या सुविधाही उपलब्ध करून देण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.