मान्सून आणि... ! महाराष्ट्रभरात पावसाची तुफान बॅटिंग; 'या' जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट 

प्रत्येकाच्या आयुष्यात पाऊस वेगळाच आनंद घेऊन येतो. अनेकांना तो सुखावणारा वाटतो तर अनेकांच्या अडचणी वाढवणारा...

Advertisement
Read Time: 4 mins
मुंबई:

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी तुंबले असून अनेकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. यंदाच्या वर्षी दोन दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असला तरी पावसामुळे होणाऱ्या दैनेमुळे चिंताही वाढली आहे.

धाराशिव परिसरात घरात पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त
धाराशिव परिसरात पहिल्याच पावसात शहरातील फकीरा नगर भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू पाण्यात बुडाल्याने नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. घरातील ज्वारी भरून ठेवलेली पोती पाण्यात भिजल्याने ज्वारी आणि धान्याचे मोठं नुकसान झालंय. आपल्या घरातील पाणी बादलीने उपसून बाहेर काढण्याचा केविलवाण प्रयत्न लोक करत आहेत. या भागातील गटारं तुडुंब भरून रस्त्यावर पाणी जमा झाले आहेत. त्यामुळे सरकारने पावसाळ्या पूर्वीची कामं योग्य पद्धतीने केली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.  झाल्यानें हेच पाणी लोकांच्या घरांमध्ये घुसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Advertisement

जालना जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाचं आगमन
राज्यात 7 जूनपासून मृग नक्षत्र सुरू झालंय. रात्री जालना जिल्ह्यातील बहुतांश भागात मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावलीय. अंबड तालुक्यातील माहेर भायगाव परिसरात ही जोरदार पाऊस झाल्याने सुकाना नदी ओसंडून वाहू लागलीय. काल झालेल्या पाऊसामुळे जिल्ह्यात खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने सुरूवात झालीय. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मान्सूनचे आगमन काही दिवसांतच होईल. त्यामुळे रात्री झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागात सध्या पेरणीची कामाला ही या पावसामुळे वेग येणारे आहे.

Advertisement

धुळे जिल्ह्यात सर्वत्र वादळी पाऊस; पाऊस सुरु होताच वीज गुल
धुळे तालुक्यासह धुळे शहरात रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. पावसाला सुरुवात होताच नेहमीप्रमाणे शहरातील वीज गुल झाली. धुळे तालुक्यासह शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसासोबत मोठ्याने विजेचा कडकडाट होत होता. पावसाला सुरुवात होण्याआधी वारा सुटल्याबरोबर वीज गुल झाल्याने नागरिक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले. वीज दुरुस्तीच्या नावाखाली काल रात्रभर विजेचा लपंडाव सुरू होता.

Advertisement

नक्की वाचा - Vikhroli Slab Collapsed : विक्रोळीत स्लॅब कोसळून 10 वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट 
रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्री काही ठिकाणी पावसाने चांगलीच बॅटिंग केली. गेले काही दिवस जिल्ह्यात चांगला पाऊस बरसत आहे. आज सकाळपासून मात्र जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, मात्र दुपारनंतर पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या पाऊस चांगला बरसत असल्याने शेतीच्या कामांना देखील वेग आला आहे.

सोलापूरात जनजीवन विस्कळीत
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात तुफान पावसामुळे शहरातील गणेश पेठ, मंगळवार बाजारात कमरेपर्यंत पाणी साचले. गणेश शॉपिंग सेंटर येथे पावसाच्या पाण्यात गाडी वाहून जाताना युवकांनी जीवावर उदार होत ती दुचाकी वाचवली. सैफुल, गुरुवार पेठ भागात घरात पाणी शिरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सायंकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक सकल भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचलं असून तुफान पावसामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातही मुसळधार पावसाची हजेरी पहायला मिळाली.

मनमाडला पावसाची जोरदार बॅटिंग
नाशिकच्या मनमाड शहर परिसरात काल रात्री मेघ गर्जनेसह पावसाने धुंवाधार बॅटिंग केली. सुमारे तासभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा व पांझन नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. पाऊस पडल्याने खरीप हंगामाच्या पेरणी कामाला सुरूवात होणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.

देवळ्याच्या उमराणे परिसरात  पावसाचा हाहा:कार 
देवळ्याच्या उमराणे व तिसगाव परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसाने अक्षरशः हाहाकार घातला. उमराण्याच्या कांदा व्यापाऱ्याच्या शेडमध्ये पावसापासून बचावासाठी थांबलेल्या पिता -पुत्रावर वादळी वाऱ्याने कांद्याचे शेड कोसळून देविदास अहिरे हा 40 वर्षीय इसम ठार झाला तर भाऊराव अहिरे जखमी झाले. दुसऱ्या एका घटनेत तिसगावच्या इंदिरानगर परिसरात वीज कोसळून आकाश देवरे हा वीस वर्षीय तरुण मृत्युमुखी पडला आणि एक बैलही ठार झाला. उमराणे परिसरात दोन शेतकऱ्यांच्या कांद्याच्या शेडाचे पत्रे उडल्याने कांदा भिजून लाखो रुपयांचं नुकसान झालं. तर वादळी वाऱ्याने अनेक घरांचे छताचे पत्रे उडाले. झाडे उन्मळून वाहनावर पडल्याने नुकसान झाले. विजेचे खांबही कोसळ्याने वीज पुरवठा देखील खंडीत झाला होता. प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात 
जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. गेल्या पाच दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. मात्र चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.