Pune Rain Update : मुसळधार पावसामुळे पुणे बेहाल झालं आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेलाय. अडकलेल्या नागरिकांना बोटीतून बाहेर काढण्यात येत आहे. पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आलीय. शहरातील अग्निशमन दल, पोलीस, एसडीआरएफ आणि एनडीआरएफसह अन्य एजन्सी वेगवेगळ्या भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम करत आहेत. गुरुवारी सकाळी पुणेकर उठले तेंव्हा त्यांना परिसरात 3 ते 5 फूट पाणी दिसलं. नावेतून या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.
बचाव पथकानं घरात तसंच दुकानात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटींचा आणि दोरींचा वापर केला. काही घरामध्ये तर छतापर्यंत पाणी पोहोचलं होतं. एनडीआरएफनं निबंज नगर, डेक्कन जिमखाना, सिंहगड रोड या भागा बचाव मोहीम सुरु केली आहे. हा परिसर पावसामुळे सर्वात प्रभावित झाला आहे. शहरात गेल्या 24 तासांमध्ये 200 मिली मिटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
खडरवासला धरणातून 40 हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडल्यानं परिस्थिती आणखी खराब झाली, अशी माहिती केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
नाराज पुणेकरांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. प्रशासनानं कोणतीही सूचना न देता पहाटे 4 च्या सुमारास मुळा-मुठा धरणाच्या जवळचे गेट उघडले. प्रशासनानं वेळीच सूचना केली असती तर लोकांना सुरक्षित स्थळी जाता आलं असतं, असं त्यांनी सांगितलं.
जवळपास संपूर्ण शहरातील रस्त्यांवर पाणी आल्यानं पूराची परिस्थिती झाली आहे. या पाण्यात अनेक दूचाकी तसंच चार चाकी वाहनं अडकली आहे. पुणेकर कंबरेपर्यंत, गळ्यापर्यंत आलेल्या पाण्यात शिरुन स्वत:चं सामान वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
भिडे पूल, होळकर पूल, झेड ब्रिज आणि परिसरातील कॉलनी, गरवारे कॉलेजजवळचे खिल्लारे कॉम्पलेक्स, पुणे महापालिकेच्या कार्यलायसमोरचा पूल यासारखे प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुण्यातील नद्या पावसानं दुथडी भरुन वाहात आहेत.
खंडाळा, लोणावळा, पिंपरी-चिंचवड, मुळशी, खेड, भोर, मावळ, हवेली, बारामती, लवासासह अनेक ठिकाणी गेल्या 24 तासांमध्ये 300 मिली मिटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
पुणे शहर तसंच परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन बचाव पथक तसंच पोलिसांनी केलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही परिसरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांची अडचण आणखी वाढलीय. पुणे शहरात ऑरेंड अर्लट जारी करण्यात आला असून सर्व टीम हाय अलर्टवर आहेत. पूरामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली.