Pune News : पुणे शहरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील अनेक स्थानिक शाळांनी आज (15 सप्टेंबर 2025) सुट्टी जाहीर केली आहे.
हडपसर परिसरातील बहुतांश शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. अचानक आलेल्या या पावसाने शहरातील वाहतूक व्यवस्था मंदावली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, तसेच कोणताही अपघात टाळता यावा यासाठी शाळांनी हा निर्णय घेतला आहे.
(नक्की वाचा- Rain Update: मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट', मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज)
पुणे महानगरपालिकेने आणि प्रशासनाने नागरिकांना आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुढील काही तास शहरातील परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शाळांनी सुट्टी जाहीर केल्याने पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
पुढील 3 तास मुसळधार पावसाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, "पुढील 3 तासात अहिल्यानगर, बिड, पुणे, सोलापूर येथे काही ठिकाणी ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळ येण्याची शक्यता आहे."