मोहसिन शेख, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhaji Nagar Traffic News : छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर आज वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला.फुलंब्री शहराच्या मुख्य चौकात गेल्या तीन तासांपासून वाहनांच्या चाका थांबल्या आहेत.सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे,एका गंभीर रुग्णाला घेऊन जाणारी ॲम्बुलन्स तब्बल 20 मिनिटांपासून या महाभयंकर कोंडीत अडकून पडली आहे.सायरनचा आवाज घुमतोय,पण रस्ता मोकळा व्हायला तयार नाही. रुग्णाचे नातेवाईक हतबल झाले असून वेळेवर उपचार न मिळाल्यास जबाबदार कोण? असा जळजळीत सवाल आता उपस्थित केला जात आहे.
तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
फुलंब्रीतील मुख्य चौकात तिन्ही दिशांनी वाहनांचे जणू डोंगर उभे राहिले आहेत.छत्रपती संभाजीनगरकडून जाणारी आणि जळगावकडून येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.तब्बल दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून भर उन्हात प्रवासी आणि वाहनधारक अक्षरशः होरपळून निघत आहेत.प्रशासनाचे आणि वाहतूक पोलिसांचे या नियोजनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा >> Mumbai Pune Expressway: मिसिंग लिंकचा मुहूर्त ठरला, टोलबाबत मोठा निर्णय, अपघात अन् विलंबाला कायमचा ब्रेक
नवरदेवांची वरात रस्त्यावरच
आज लग्नाचा मोठा मुहूर्त असल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ अधिक होती.मात्र,या कोंडीचा फटका चक्क नवरदेवांनाही बसला आहे.लग्नासाठी वेळेत पोहोचण्याचे स्वप्न पाहणारे अनेक नवरदेव या वाहतूक कोंडीत अडकले आहेत.नवरदेवांच्या गाड्या तासनतास एकाच जागी उभ्या असल्याने वऱ्हाड्यांचीही मोठी तारांबळ उडाली.'लग्नाच्या बोहल्यावर चढण्याऐवजी नवरदेव रस्त्यावर अडकले',अशी चर्चा आता फुलंब्रीत रंगत आहे.
नक्की वाचा >>HSC Result Update : बारावीचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार? डिजीलॉकरवर मोठी अपडेट, कसा पाहाल निकाल?
प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघडा
गेल्या तीन तासांपासून शहर स्तब्ध झाले असताना पोलीस प्रशासन नेमके कुठे आहे? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.अरुंद रस्ते आणि त्यातच बेशिस्त पार्किंगमुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे.महामार्गावर अशा प्रकारे दरवेळी होणारी कोंडी फुलंब्रीकरांसाठी आता डोकेदुखी ठरत आहे.जर या कोंडीत रुग्णवाहिकेतील रुग्णाचे काही बरे-वाईट झाले,तर याला प्रशासकीय निष्काळजीपणा कारणीभूत ठरेल,यात शंका नाही.