हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने काँग्रेस आशा-आकांक्षांना तडा गेला आहे. हरियाणामध्ये भाजपने विजयाची हॅटट्रिक साजरी केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणाच्या निकाल काँग्रेसच्या बाजून लागेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र काँग्रेसला हरियाणात यंदाही सत्तेपासून दूर राहावं लागणार आहे. हरियाणाताली पराभवाचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला आगामी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी होऊ शकते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ठाकरे गट, शरद पवार गटाची बार्गेनिंग पॉवर वाढणार?
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत झालेल्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने 21 जागा लढवून 9 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 17 जागा लढवून 13 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने 10 पैकी 8 जागा जिंकल्या. काँग्रेसने या कामगिरीच्या महाराष्ट्रात जास्त जागांवर दावा केला आहे. काँग्रेसचा लोकसभेत स्ट्राइक रेट चांगला असल्याने जास्त जागा मिळाव्यात, असा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 100 ते 110 जागा हव्या आहेत. जागावाटपाबाबत अनेक बैठका महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झाल्या आहेत. मात्र अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. मात्र यापुढे होणाऱ्या जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी होऊ शकते.
(नक्की वाचा- 'मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा", उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार आणि हरियाणाचा निकालाच्या टायमिंगची चर्चा)
काँग्रेसची भिस्त मित्रपक्षांवर?
हरियाणामध्ये काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवली होती. मात्र काँग्रेसला म्हणावं तसं यश मिळालं नाही. यामुळे काँग्रेसची कामगिरी मित्रपक्षांवर बऱ्यापैकी अवलंबून आहे, असं दिसून आलं आहे. हीच बाब शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी बोलून दाखवली. महाराष्ट्रात देखील काँग्रेसची कामगिरी मित्रपक्षांवर जास्त अवलंबून असेल, असं या हरियाणाच्या निकालातून स्पष्ट होतंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट सध्या फ्रंटफूटवर आल्याचं दिसून येत आहे.
महाविकास आघाडीसाठी वेक अप कॉल
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना विजयाचा आत्मविश्वास आहे. तशी राजकीय परिस्थिती देखील राज्यात हळूहळू निर्माण होऊ लागली आहे. भाजपमधील अनेक नेते महाविकास आघाडीत सामील होत आहे. मात्र हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीसाठी वेक अप कॉल असेल. विधानसभा निवडणुकीत आम्हीच जिंकू हा फाजिल आत्मविश्वास बाजून ठेवून महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना ग्राऊंडवर उतरुन काम करावं लागणार आहे.
(नक्की वाचा - Haryana Elections Results 2024 हरियाणातील काँग्रेसच्या धक्कादायक पराभवाची 5 प्रमुख कारणं कोणती?)
भाजप आणि महायुतीमध्ये उत्साह
लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यंमध्ये आलेली मरगळ हरियाणा निवडणुकीच्या निकालाने झटकून निघेल. भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास विधानसभा निवडणुकीच्या फायद्याची ठरेल. भाजपविषयी देशभरात नाराजीचं चित्र आहे, हे विरोधकांचे आरोप हरियाणा निवडणुकीत खोटे ठरले आहेत. महाराष्ट्रात विरोधकांच्या आरोपांना खोडून काढणे देखील भाजप नेत्यांना सोपं होईल.
जातीय समीकरण
हरियाणात भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठे नेतृत्व बदल केले होते. मनोहरलाल खट्टर यांना बाजूला सारून नायब सिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली होती. जाट मतदारांचा फटका बसेल याचा भाजपला अंदाज होता. त्यामुळेच भाजपने ओबीसी मतांवर लक्ष केंद्रीत केलं. हरियाणात ज्येष्ठ नेते भूपिंदर सिंह हुड्डांकडे काँग्रेसने प्रचाराची धूरा सोपवली होती. हुड्डा यांनी जाट मतांवर प्रामुख्यानं फोकस केला होता. त्यामुळे जाट सोडून अन्य जातींच्या मतदारांचं काँग्रेसविरोधात ध्रुवीकरण झाले. काँग्रेसला सत्ता मिळाली तर हरियाणातील प्रबळ जातीचं पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित होईल, अशी अन्य मतदारांची समजूत झाल्यानं अन्य पक्षांनी भाजपाच्या बाजूनं मतदान केलं. हरियाणातील जातीय समीकरण हा महाराष्ट्रील सर्वच पक्षांना एक धडा आहे.