जाहिरात

Dombivli News : देशात पहिला आला डोंबिवलीचा शार्दुल; CA च्या परीक्षेत मिळवले ऐतिहासिक यश, वाचा यशाचं रहस्य

Dombivli News : राष्ट्रीय स्तरावरील या घवघवीत यशामुळे शार्दुलने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण डोंबिवलीचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे.

Dombivli News : देशात पहिला आला डोंबिवलीचा शार्दुल; CA च्या परीक्षेत मिळवले ऐतिहासिक यश, वाचा यशाचं रहस्य
Dombivli News : या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना शार्दुलच्या या प्रवासातून नक्कीच मोठी प्रेरणा मिळेल.
डोंबिवली:

Dombivli News : डोंबिवलीच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, येथील शार्दुल शेखर विचारे याने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे घेण्यात आलेल्या सीए इंटरमीडियेट परीक्षेत देशभरातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय स्तरावरील या घवघवीत यशामुळे शार्दुलने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण डोंबिवलीचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे. कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर त्याने देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना मागे टाकत हे अव्वल स्थान मिळवले आहे.

सीए फाउंडेशनमध्येही तिसरा रँक

शार्दुलचा हा यशाचा आलेख सुरुवातीपासूनच चढता राहिला आहे. यापूर्वी त्याने सीए फाउंडेशन परीक्षा दिली होती, ज्यामध्ये त्याने देशात तिसरा क्रमांक पटकावला होता. फाउंडेशन उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने लगेचच सीए इंटरमीडियेटचे क्लासेस सुरू केले होते. शार्दुलच्या या यशाचे श्रेय त्याने स्वतःचे आई-वडील, बहीण, मित्रमंडळी, त्याचे क्लासेस आणि कॉलेज यांना दिले आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना शार्दुलच्या या प्रवासातून नक्कीच मोठी प्रेरणा मिळेल.

कसा केला अभ्यास?

आपल्या अभ्यासाच्या पद्धतीबद्दल सांगताना शार्दुल म्हणाला की, सुरुवातीला जवळजवळ 7 ते 8 तास क्लासेस चालू असायचे आणि त्यानंतर तो घरीही रोज 2 तास अभ्यास करायचा. पुढे 7 महिन्यांत क्लासेस संपल्यानंतर त्याने घरच्या अभ्यासाचा वेग वाढवला. परीक्षा जवळ आल्यावर तो घरी रोज 8 ते 10 तास सातत्याने अभ्यास करत होता. 

( नक्की वाचा : Dombivli News: जिद्दीचा डोंबिवली पॅटर्न! आईच्या निधनानंतरही न खचता सोहननं CA परीक्षेत अख्ख्या देशात कमावलं नाव )

शार्दुलने प्रांजळपणे कबूल केले की, मला परीक्षेत रँक येईल हे माहीत होते, पण मी देशात पहिला येईन असा विश्वास नव्हता. त्यामुळे निकाल पाहिल्यावर मला खूप खूप आनंद झाला. इतर विद्यार्थ्यांना सल्ला देताना तो म्हणाला की, तुम्ही कोणताही अभ्यास करा, पण तो आवडीने करा आणि त्यात सातत्य ठेवा, तुम्हाला फळ नक्की मिळेल.

शार्दुलचे वडील शेखर विचारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. माझा मुलगा देशात पहिला आला असून आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या अखंड मेहनतीला आज योग्य यश आले आहे, त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. तर त्याची आई सीमा विचारे यांनी सांगितले की, हा क्षण आमच्यासाठी खूप मोठा असून आम्हाला गहिवरून आले आहे. शार्दुल शाळेत असल्यापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार आहे आणि आज त्याच्या याच हुशारीचे आणि कष्टाचे उत्तम फळ त्याला मिळाले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com