कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून 40 लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना 22 लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या 11 लाख कापूस गाठी पडून आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस महामंडळाला (CCI) हमीभावाने कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.
(नक्की वाचा- महाविकास आघाडीचे सरकार आल्यास 7 दिवसांत केंद्र सरकार पडणार; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, सध्या कापसाचे भाव 6500 ते 6600 रुपये प्रति क्विंटल असून हा भाव 7122 रुपये या हमीभावापेक्षा कमी आहे. बाजारात कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस विकलेला नाही. शेतकऱ्यांकडे कापूस आहे तसेच सीसीआयकडेही कापूस गाठी पडून आहेत.
देशात एवढ्या मोठया प्रमाणात कापूस असताना कापसाची आयात केल्याने कापूस बाजार कोलमडून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांनाच बसेल आणि या निर्णयाचा फायदा फक्त व्यापाऱ्यांना होणार आहे. महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकरी आधीच संकटात आहे. कमी भाव,शेती अवजारांवर 12 ते 18 टक्के जीएसटी आणि अवकाळी पाऊस या दुष्टचक्रात कापूस उत्पादक शेतकरी सापडला आहे.
(नक्की वाचा- लोकसभेनंतर विधानसभेतही 'सांगली पॅटर्न', मनोज जरांगेंसोबत भेटीगाठी)
खराब हवामानामुळे यावेळी 19 लाख हेक्टरील कापूस क्षेत्राचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाईही अद्याप कागदावरच आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना केवळ विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कापूस आयातीवर बंदी घालावी, असे नाना पटोले म्हणाले.