सूरज कसबे, पिंपरी चिंचवड
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं सरकारी वाहन पेटवून दिल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमधून समोर आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयात आज संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.
विनायक सोपानराव ओव्हाळ या अंध व्यक्तीने त्याच्या काही साथीदाराच्या मदतीने चिंचवड विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांचे चार चाकी वाहन पेट्रोल टाकून पेटवून दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंध आणि अपंग बांधवांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या योजनेचा लाभ मिळत नसल्याने विनायक ओव्हाळ यांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. योजनांचा लाभ मिळत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं वाहन पेट्रोल टाकून पेटवून देऊन त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
( नक्की वाचा : 2 मिनिट उशीर झाला आणि अर्ज कायम राहिला, सोलापूरच्या घटनेची राज्यात चर्चा )
अनिल पवार यांचं वाहन पेट्रोल टाकून पेटवल्या प्रकरणी तीन आरोपींना सध्या काळेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विनायक सोपानराव ओव्हाळ, नागेश गुलाबराव काळे आणि अजय सुधाकर राठोड असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचं नावे आहेत.
नक्की वाचा: "मनोज जरांगेंचा निर्णय आमच्यासाठी योग्य", शरद पवारांनी उलगडून सांगितलं
यातील मुख्य आरोपी विनायक सोपानराव ओव्हाळ यांनी 15 ऑगस्टच्या दिवशी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांचं वाहन तोडून आपला रोष व्यक्त केला होता. तर आज पुन्हा एकदा विनायक ओव्हाळ यांनी आपल्या दिव्यांग सहकाऱ्यांच्या मदतीने अतिशय टोकाचा पाऊल उचलत गाडी पेटवली आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.