Japani Language Course: भारतीयांना जपानी भाषा शिकवण्यासाठी धडपड; रोजगार,व्यवसायाच्या अफाट संधी खुल्या होणार

Japani Language Course: भारत-जपान शैक्षणिक सहकार्य वाढवण्यासाठी या वर्षी हैदराबाद येथे विद्यापीठ परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे राजदूत किची ओनो यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

भारत आणि जपानचे सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय संबंध अतिशय घनिष्ट आहेत. मात्र, भारतातील युवकांना जपानमधील विद्यापीठांबद्दल फारशी माहिती नाही. सध्या भारतातून केवळ 1600 विद्यार्थी जपानमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत, तर चीनमधून एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी जपानमध्ये शिक्षण घेत आहेत. ही बाब निदर्शनास आणून जपानचे भारतातील राजदूत किची ओनो यांनी महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये जपानी भाषेचे वर्ग सुरू करण्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मुंबई भेटीवर आलेल्या जपानच्या राजदूतांनी मंगळवारी, 29 जुलै रोजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

जपानी शिकल्यास काय फायदा होणार?

भारत-जपान शैक्षणिक सहकार्य वाढवण्यासाठी या वर्षी हैदराबाद येथे विद्यापीठ परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे राजदूत किची ओनो यांनी यावेळी सांगितले. दोन्ही देशांमधील लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढवण्यासाठी जपान कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान आणि विद्यार्थी आदानप्रदान या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी उत्सुक असल्याचे ओनो यांनी नमूद केले. जपानी पर्यटक अधिक संख्येने भारतात यावेत यासाठी येथील पायाभूत सुविधा अधिक विकसित करणे, पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्याच्या सुविधा वाढवणे, तसेच जपानी भाषेच्या दुभाषांची उपलब्धता करणे आवश्यक असल्याचे राजदूतांनी सांगितले.

Advertisement

विद्यापीठांमध्ये जपानी भाषेचे वर्ग सुरू करणार

जपान आणि भारताचे राजनैतिक संबंध अतिशय घनिष्ट आहेत, परंतु त्या तुलनेत दोन्ही देशांमधील व्यापार चीन-जपान व्यापाराच्या तुलनेने खूपच कमी आहे. द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी दोन्ही देशांमधील चेंबर्स ऑफ कॉमर्स मध्ये तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढवणे आवश्यक आहे, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी राजदूतांना सांगितले. तसेच व्यापाराव्यतिरिक्त कृषी, क्रीडा, शिक्षण, कौशल्य या क्षेत्रातही सहकार्य वाढवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. जपानमध्ये भारतीय विद्यार्थी कमी संख्येने येण्यामागे तेथील भाषेची अडचण असल्याचे नमूद करून, आपण मुंबईसह इतर विद्यापीठांना जपानी भाषेचे वर्ग सुरू करण्याबद्दल सूचित केले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

Advertisement

बौद्ध धर्मामुळे भारत आणि जपानमधील सांस्कृतिक संबंध घनिष्ट आहेत, असे सांगून हे संबंध आणखी वाढवण्यासाठी जपानने क्रीडा क्षेत्रात - विशेषतः व्हॉलीबॉल आणि टेबल टेनिसमध्ये - तसेच कृषी विज्ञान क्षेत्रात - विशेषतः मशरूम लागवडीमध्ये - महाराष्ट्राला सहकार्य करावे असे राज्यपालांनी सांगितले. जपानने आपली मातृभाषा जपल्यामुळे तेथील संस्कृतीवर इंग्रजी भाषेसोबत येणाऱ्या पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव पडला नाही. भारतातील लोकांना जपानच्या लोकांची शिस्तबद्ध जीवनशैली खूप आवडते, असे राज्यपालांनी यावेळी नमूद केले.वस्त्रोद्योग क्षेत्रात जपानने भारताला सहकार्य केले, तर त्याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागांना होईल, असे राज्यपालांनी सांगितले. या संदर्भात वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडित विक्रेता - ग्राहक परिषदेचे आयोजन केले जावे, असेही राज्यपालांनी सांगितले. वस्त्रोद्योगाव्यतिरिक्त रत्न व आभूषण तसेच हिरे व्यापार या क्षेत्रात देखील भारतीय उत्पादने जपानी नागरिकांच्या पसंतीस उतरतील, असे राज्यपालांनी सांगितले.

Advertisement

जपानी लोकांमध्ये रजनीकांत यांची क्रेझ

भारतीय चित्रपट जपानमध्ये लोकप्रिय आहेत. 'मुत्थु' या तामिळ चित्रपटामुळे रजनीकांत यांचे नाव जपानमध्ये घरोघरी पोहोचले होते, असे नमूद करून जपानने चित्रपट निर्मिती क्षेत्रात देखील सहकार्य करावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. चित्रपट तसेच ॲनिमेशन निर्मितीच्या माध्यमातून पर्यटनालाही चालना देता येईल, असे मत यावेळी राजदूत किची ओनो यांनी व्यक्त केले. या बैठकीला जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी, भारतातील जपान दूतावासाचे प्रथम सचिव कावाकामी मासाहिरो, जपान दूतावासातील द्वितीय सचिव हासेगावा नोरिफुमी, उप-वाणिज्य दूत निशियो रियो आदी उपस्थित होते.

Topics mentioned in this article