छत्रपती संभाजीनगरच्या विमान प्रवाशांसाठी एक वाईट बातमी आहे. इंडिगो एअरलाईन्सने हैदराबाद-छत्रपती संभाजीनगर ही दुपारची लोकप्रिय विमानसेवा आता थेट मार्च अखेरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभी ही सेवा केवळ 15 ते 31 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली होती. मात्र आता कंपनीने ही स्थगिती संपूर्ण हिवाळी सत्रासाठी वाढवली आहे. विमानांची कमतरता आणि केंद्र सरकारच्या उडान योजनेतील अनुदानाचा फायदा घेण्यासाठी कंपनीने प्रवाशांना वाऱ्यावर सोडल्याची टीका होत आहे.
इंडिगोकडून अनेक शहरांची सेवा गुंडाळली
केवळ हैदराबादच नाही, तर इंडिगोने इतर महत्त्वाच्या शहरांची सेवाही विस्कळीत केली आहे. जयपूर आणि अहमदाबाद सेवा आधीच बंद करण्यात आली असून, आता लखनऊ आणि नागपूर उड्डाणांनाही कात्री लावली आहे. छत्रपती संभाजीनगर-गोवा या लिंक सेवेतील लखनऊ आणि नागपूरचे थांबे रद्द करण्यात आले असून आता केवळ गोवा सेवा सुरू ठेवली आहे. तसेच बेंगळुरू सेवेचाही आठवड्यातील एक दिवस कमी करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)
धुक्यामुळे सचखंड एक्स्प्रेस 10 तास उशीराने
विमानसेवेसोबतच रेल्वे वाहतुकीलाही निसर्गाचा मोठा फटका बसला आहे. उत्तर भारतात पसरलेल्या दाट धुक्यामुळे गुरुवारी (25 डिसेंबर) रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. अमृतसरहून येणारी सचखंड एक्सप्रेस तब्बल 10 तास 14 मिनिटे उशीराने शहरात पोहोचली. यामुळे प्रवाशांना दिवसभर रेल्वे स्थानकावर ताटकळत थांबावे लागले. नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची मोठी गर्दी असतानाच हा गोंधळ उडाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.
विमान उड्डाणांनाही विलंब
धुक्याचा परिणाम केवळ रेल्वेवरच नाही तर विमान उड्डाणांवरही दिसून आला. बेंगळुरू येथून शहरात येणारे इंडिगोचे विमान नियोजित वेळेपेक्षा 1 तास 9 मिनिटे उशीराने दाखल झाले. सकाळी 6.55 वाजता निघण्याऐवजी हे विमान 8.29 वाजता सुटले आणि 9.39 वाजता शहरात पोहोचले. सध्या शहरातून केवळ सकाळी 6.40 ची हैदराबाद सेवा सुरू असून दुपारच्या फेऱ्या बंद झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.