आकाश सावंत, बीड
Beed News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कायदेशीर लढाई आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बीड येथील विशेष MCOCA न्यायालयात मंगळवारी दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद संपन्न झाला. न्यायालयाने मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्यासह सर्व आरोपींना त्यांच्यावर असलेले खून, खंडणी, अपहरण आणि मकोका अंतर्गत असलेले आरोप वाचून दाखवले. सर्व आरोपींनी हे आरोप अमान्य असल्याचे न्यायालयात सांगितले आहे.
कोर्टातील नाट्यमय घडामोडी
सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी खटला लांबवण्यासाठी विविध तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. आरोपी प्रतीक घुले याने शेवटच्या क्षणी वकील बदलले, तर लॅपटॉपमधील डेटा आणि फॉरेन्सिक रिपोर्टच्या प्रती मिळाल्या नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. मात्र, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी याला तीव्र विरोध केला. "आरोपींकडून खटला 'डी फॉर डिले' आणि 'डी फॉर डिरेल' करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा घणाघाती आरोप निकम यांनी केला.
न्यायालयाने व्यक्त केली नाराजी
वारंवार वकील बदलणे आणि पुराव्यांच्या प्रतींसाठी वेळ मागण्याच्या प्रकारावर न्यायालयाने कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. "प्रत्येक तारखेला असे व्हायला नको," असे सुनावत न्यायालयाने आरोपींना आजच डेटा तपासून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना विचारले की, "तुमच्या विरोधात खंडणी, हत्या आणि संघटित गुन्हेगारीचे जे आरोप आहेत ते तुम्हाला मान्य आहेत का?" यावर वाल्मीक कराड आणि इतर आरोपींनी "आम्हाला आरोप मान्य नाहीत," असे उत्तर दिले.
(नक्की वाचा- Navi Mumbai News: अॅम्बुलन्स चालक जेवायला गेला, तरुणाचा उपचाराविनाच मृत्यू; वाशीतील घटना)
उज्वल निकम यांचे महत्त्वाचे मुद्दे
खंडणी मिळण्यात अडथळा निर्माण केला म्हणून संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींचा उद्देश गुन्हेगारी साम्राज्य निर्माण करून दहशत पसरवणे हाच होता. प्रत्यक्ष पुराव्याचे काम आता लवकरच सुरू होणार आहे. 8 जानेवारीच्या सुनावणीनंतर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाईल, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.
कोर्टात सुनावणी दरम्यान काय काय घडलं?
सुनावणीदरम्यान चार नंबरचा आरोपी प्रतीक घुले याने अचानक ॲड. बारगजे यांची स्वतंत्र वकील म्हणून नियुक्ती केली. नवीन वकिलांनी "मला पुरावे पाहण्यासाठी वेळ हवा," अशी मागणी केली. यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. "खटल्याला आधीच बराच विलंब झाला आहे. वारंवार वकील बदलून तीच ती कारणे दिली जात आहेत, हे व्हायला नको," अशा शब्दांत कोर्टाने आरोपींना फटकारले.
पुराव्यांच्या प्रतींवरून वाद
आरोपींच्या वकिलांनी असा दावा केला की, "लॅपटॉपमधील फॉरेन्सिक डेटाच्या प्रती आम्हाला मिळालेल्या नाहीत. जोपर्यंत पुरावा मिळत नाही, तोपर्यंत तो स्वीकारला जाऊ नये." यावर उज्वल निकम यांनी स्पष्ट केले की लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबमध्ये आहे. तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले की, "यात खाजगी पुरावे असल्याने त्याचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे सरसकट डेटा देता येणार नाही." न्यायालयाने मध्यस्थी करत, डेटा उपलब्ध होताच वकिलांना देण्याचे आदेश दिले.
(नक्की वाचा- महायुतीत दोस्तीत कुस्ती! पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या NCP ला शह देण्यासाठी भाजप-शिंदेंची सेना एकत्र)
प्रतीक घुलेच्या वकिलांनी "हा AI चा जमाना आहे, पुराव्यांशी काहीही छेडछाड होऊ शकते, मला अधिक वेळ द्यावा," अशी विनंती केली. मात्र, न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावत आरोपींना आजच्या आज डेटा तपासून घेण्यास सांगितले. विशेष म्हणजे, वाल्मीक कराडसह सर्व आरोपींनी आपले वकील बदलण्याची इच्छा व्यक्त केली, जे खटला लांबवण्याचे एक साधन असल्याचे सरकारी पक्षाने नमूद केले.
फक्त हो किंवा नाही सांगा, कराडला सुनावलं
न्यायालयाने सर्व आरोपींना साक्षीत उभे करून त्यांच्यावर असलेले गंभीर आरोप वाचून दाखवले. "तुम्ही खंडणी, अपहरण, हत्या आणि मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारीचे कृत्य केले आहे, हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का?" असा थेट प्रश्न न्यायालयाने विचारला. यावर मुख्य आरोपी वाल्मीक कराड याने चार वेळा 'आरोप अमान्य' असल्याचे सांगितले. "मला बोलायचे आहे," असे म्हणणाऱ्या कराड याला कोर्टाने "फक्त हो किंवा नाही सांगा," असे बजावले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world