NDTV Marathi Manch: 'घरात कुणीही पोलीस नव्हते तरीही...'; IPS मोक्षदा पाटील यांनी उलगडला यशस्वी प्रवास

IPS Mokshada Patil: एनडीटीव्ही मराठीच्या 'नारी शक्ती महाराष्ट्राची!' या विशेष मंचावर मुंबईच्या अप्पर पोलीस आयुक्त मोक्षदा पाटील यांनी आपल्या पोलीस दलातील प्रवासाचे आणि अनुभवाचे अनेक पैलू उलगडले.

जाहिरात
Read Time: 3 mins

NDTV मराठीच्या 'नारी शक्ती महाराष्ट्राची!' या कार्यक्रमात मुंबईच्या अप्पर पोलीस आयुक्त मोक्षदा पाटील यांनी उपस्थिती लावली. या मंचावरून बोलताना त्यांनी आपला प्रशासकीय सेवेतील प्रवास, ग्रामीण भागातील महिला पोलिसांची जिद्द, महिलांवरील अत्याचार आणि डिजिटल युगातील सायबर गुन्हेगारी यांवर अत्यंत रोखठोक आणि प्रभावी मते मांडली.

घरात कोणीही पोलीस बॅकग्राउंड नाही!

आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगताना मोक्षदा पाटील यांनी म्हटलं की,  "माझ्या अख्ख्या कुटुंबात पोलीस दलात कोणीही नव्हते. माझे वडील ठाणे महानगरपालिकेत अभियंता (Engineer) म्हणून कार्यरत होते, तर आजोबा रेल्वेत होते. त्यामुळे घरात सर्वांचा कल सरकारी नोकरी करावी असाच होता. मी युपीएससीची (UPSC) तयारी केली आणि 'आयपीएस' (IPS) झाले. जेव्हा मला महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा मी माझ्या मातृभूमीतच सेवा करण्याचे निश्चित केले."

Advertisement

आयपीएसच्या ट्रेनिंगमध्ये महिला-पुरुष भेदभाव नाही!

'सदर वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी'मधील (SVPNPA) आपल्या प्रशिक्षणाचे दिवस आठवताना त्यांनी महिला अधिकाऱ्यांच्या समानतेवर जोर दिला.  पोलीस दलात महिला म्हणून कुठेही वेगळी वागणूक दिली जात नाही. आयपीएस महिला म्हणून वेगळे किंवा सोपे ट्रेनिंग नसते. पुरुष सहकाऱ्यांना जे आणि जितके कठीण ट्रेनिंग घ्यावे लागते, तेच महिलांनाही सारख्याच पद्धतीने पूर्ण करावे लागते. अधिकारी म्हणून मैदानावर उतरल्यावर सर्वांना समान अधिकार मिळतात. कायदा राबावण्यासाठी लागणारे ज्ञान आणि कौशल्य (Skills) सर्वांसाठी सारखेच असते. "मला या पदावर काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी ईश्वराची सदैव ऋणी आहे," असे उद्गार त्यांनी काढले.

छत्रपती संभाजीनगरमधील एक भावुक प्रसंग 

छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्तव्य बजावत असतानाचा एक अत्यंत संवेदनशील प्रसंग त्यांना मंचावर शेअर केला. ग्रामीण भागातील मुलींमध्ये अफाट टॅलेंट आहे, पण आपण त्यांना केवळ बोलण्यातून संधी देतो, प्रत्यक्षात विसरतो, असे सांगत त्यांनी एका धाडसी मुलीची गोष्ट सांगितली. "छत्रपती संभाजीनगरमधील एका लहान मुलीने मला थेट एक पत्र पाठवले होते. त्या पत्रासोबत तिने तिची मार्कशीट, ओळखपत्राची झेरॉक्स आणि तिच्या घराचा हाताने काढलेला नकाशा जोडला होता. पत्रात तिने मला कळवले की, तिची आजी तिचा बालविवाह लावून देण्याच्या तयारीत आहे. तिने मला एकच विनंती केली, 'मॅडम, माझे नाव कुठेही पुढे न आणता, काहीही करा पण माझा हा बालविवाह थांबवा'." त्या मुलीच्या पत्राची गंभीर दखल देखील मोक्षदा पाटील यांनी घेतली होती. 

(नक्की वाचा-  NDTV Marathi Manch: नारी शक्ती विधेयकाबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, पुण्याला म्हणाल्या 'क्राईम कॅपिटल')

महिलांवरील अत्याचार आणि विकृत मानसिकता

समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर बोलताना त्यांनी व्यवस्थेतील आणि मानसिकतेतील त्रुटींवर बोट ठेवले. "मुलींवर अत्याचार होतात, कुटुंबात त्यांना हिंसाचाराला तोंड द्यावे लागते. कारण दुय्यम स्थान दिले जाते तशीच वागणूक दिली जाते. महिलांना छळण्याची एक विकृत मानसिकता समाजात दिसून येते. शाळा-कॉलेजात जाणाऱ्या मुलींची छेडछाड झाल्यामुळे त्या घाबरतात आणि शिक्षण सोडून देतात, ज्यामुळे कुटुंबाचा कल त्यांचे लवकर लग्न करून देण्याकडे वाढतो."

यावर उपाय म्हणून शाळा, कॉलेज आणि ऑफिसमध्ये निर्धास्तपणे फिरणे हा प्रत्येक स्त्री आणि पुरुषाचा संविधानाने दिलेला समान हक्क आहे, याची आठवण देखील त्यांनी करून दिली. 

डिजिटल युगात गुन्हेगारांपेक्षा एक पाऊल पुढे राहणे आवश्यक!

सध्याच्या डिजिटल युगात गुन्हेगारांना पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. अनेकदा पोलिसांपेक्षाही अधिक अपडेटेड आणि आधुनिक तंत्रज्ञान गुन्हेगारांकडे असते. मात्र, अशा परिस्थितीतही पोलिसांनी गुन्हेगारांच्या नेहमी 'एक पाऊल पुढे' राहणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस दलात सातत्याने विशेष टीम , प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक कौशल्यांचा विकास केला जात असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त मोक्षदा पाटील यांनी दिली.
 

Advertisement