कोणत्याही दुकानात वस्तूंची खरेदी झाल्यानंतर बिल करत असताना ग्राहकांना त्यांचा मोबाईल क्रमांक अनेकदा विचारला जातो. ग्राहकांनी तो देण्यास टाळाटाळ केल्यानंतरही दुकानदार मोबाईल क्रमांकासाठी आग्रही असतात. गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रकार वाढले आहेत. वस्तूंचे बिल देताना मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे का? हे समजून घेणे आवश्यक आहे.
वस्तू खरेदी केल्यानंतर तसेच हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कॉफी दुकानात देयक तयार करताना ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची माहिती देणे बंधनकारक नसून कोणीही आपली वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश तावरे यांनी केले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ग्राहक व्यवहार मंत्रालयानं 26 मे 2023 रोजी दिलेल्या सुचनेप्रमाणे ग्राहकांनी शॉपिंग मॉल, किरकोळ व्यापाऱ्यांकडे वस्तू खरेदी केल्यानंतर तसेच हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कॉफीच्या दुकानात ग्राहकांनी सेवा घेतल्यानंतर शेवटी देयक तयार करताना मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक नाही.
( नक्की वाचा : मुंबई महापालिकेमध्ये बंपर भरती! अॅप्लिकेशन, पात्रता आणि किती मिळणार पगार? जाणून घ्या एका क्लिकवर )
माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 72 अ अंतर्गत वस्तू विक्रीच्यावेळी मिळालेल्या मोबाईल क्रमांकाचा ग्राहकाच्या संमतीशिवाय इतरत्र वापर करणे ही व्यक्तीशी असलेल्या कायदेशीर कराराचा भंग आहे. ग्राहकाची वैयक्तिक माहिती उघड करणे हा दंडनीय गुन्हा आहे. असे केल्याने ग्राहकांचे नुकसान झाल्यास 30वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा अथवा पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे, अशीही माहिती तावरे यांनी दिली आहे.