Bull sold for 11 Lakhs in Jalna : राज्यभरात सध्या एका बैलाची मोठी चर्चा आहे. या बैलाचं नाव 'बिजल्या' असून हा चक्क ११ लाखांना विकला गेला आहे. जालन्यातील मंठा तालुक्यातील कानफोडी येथील शेतकरी पवन राठोड याने ११ लाखांना बैल विकला आहे. पवन राठोड या शेतकऱ्याने पट्ट्यावरील धावणाऱ्या बैलाची चांगली काळजी घेतली, त्याचं पालन-पोषण केलं आणि त्याला उत्तम प्रकारे प्रशिक्षित केलं. त्यानंतर तो 'बिजल्या' म्हणून जिल्ह्यात ओळखला जाऊ लागला. हा बिजल्या बैल घोड्यालाही घाम फोडू शकतो, असंही त्याच्याविषयी बोललं जातं.
एक बैल ११ लाखांना विकला...
एक बैल लाखो रुपयात विकून जालन्यातील एक शेतकरी लखपती झाला आहे. मंठा तालुक्यातील कानफोडी गावातील पवन राठोड अस लखपती होणाऱ्या शेतकऱ्याच नाव असून या शेतकऱ्याकडे बिजल्या नावाचा एक बैल होता. घोड्यालाही घाम फोडणारा बैल अशी या बिजल्याची ओळख शंकर पटातून निर्माण झाली. बिजल्या हा शंकर पटातील बैल आहे.
त्याने अनेक शंकर पटातून पैज जिंकल्याने त्याला लाखोंची किंमत लावली जात होती. अखेर सांगली जिल्ह्यातल्या कटरेवाडी येथील सागर कटरे यांनी या बिजल्याला चक्क 11 लाख 11 हजार रुपयांना खरेदी केला आहे. त्यामुळं अवघा एक बैल विकून जालन्यातील शेतकरी लखपती झाला आहे. त्यामुळे एका बैलाने शेतकऱ्याला लखपती केल्याने परिसरात लखपती शेतकरी म्हणून या शेतकऱ्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
नक्की वाचा - Latur News : होत्याचं नव्हतं झालं! रात्रीतून दीड एकरवरील सोयाबीन जळून खाक, कर्जाचा डोंगर वाढला; शेतकरी चिंतेत
३० पैकी २५ शर्यती जिंकला..
बिजल्याबद्दल सांगावं तितकं कमी आहे. शंकरपटात शर्यतीत या बिजल्याने घोड्यांसोबत भाग घेतला आणि चक्क पहिला आला. विशेष म्हणजे जालना, वाशीम, जिंतूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर येथील ३० पैकी २५ शर्यतीत बिजल्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. यातून त्याने ३ ते ४ लाखांची कमाई केली आहे.