शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून गैरसमजुतीतून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी न्यायालयात सी समरी म्हणजेच तपास बंद करण्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे.
(नक्की वाचा- नियमांचे पालन करा...पळून जाऊ नका! पुण्यातल्या बिल्डरपुत्रानं 2 महिन्यांनी लिहिला 300 शब्दांचा निबंध)
रविंद्र वायकर यांनी काही महिन्यांपूर्वीच ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील भूखंड प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणात आझाद मैदान पोलीस ठाण्यात रविंद्र वायकर, त्यांच्या पत्नी, व्यावसायिक भागीदार आसू मेहलानी, राज लालचंदानी, प्रितपाल बिंद्रा, आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल झाला होता.
(नक्की वाचा- ऑन ड्युटी महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न, पुण्यातील खळबळजनक घटना)
आता फक्त दाऊदला क्लीन चीट देणे बाकी- राऊत
रवींद्र वायकर यांना क्लीन चीट दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, आता फक्त दाऊदला क्लीन चीट देणे बाकी आहे. रवींद्र वायकर हे ईडीला घाबरून शिंदे गटात सामील झाले होते. आमच्या नेत्यांवर चुकीच्या केसेस टाकून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही लोक घाबरून भाजप सोबत गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील घाबरून त्यांच्यासोबत गेले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, भाजपसोबत जातो तो वॉशिंग मशीनमध्ये धुवून साफ होऊन निघतो. आरोप करायचे, सोबत घायचे आणि साफ करायचे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.