मुंबईतील चेंबूर परिसरात धार्मिक आस्था आणि परंपरेला धक्का देणारी एक घटना समोर आली आहे. येथील एका मंदिरातील पुजाऱ्याने काली मातेच्या मूर्तीला कथितरित्या मदर मेरीचे स्वरूप दिल्यामुळे परिसरात मोठा वाद निर्माण झाला आहे. भाविक आणि विविध हिंदू संघटनांनी या कृतीबद्दल तीव्र आक्षेप घेतल्यानंतर, अखेर पोलिसांनी पुजाऱ्याला अटक केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
घडलेला प्रकार आणि भाविकांचा संताप
नेहमीप्रमाणे दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भाविकांना काली मातेच्या प्रतिमेत बदल झाल्याचे दिसले. पुजाऱ्याने मूर्तीला मदर मेरीच्या वेशभूषेप्रमाणे गोल्डन साडी परिधान करून विशेष स्वरूप दिले होते. या धार्मिक मूर्तीच्या बदलामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी त्वरित मंदिर व्यवस्थापनाकडे तक्रार केली. त्यानंतर हा वाद अधिक वाढला आणि अनेक स्थानिक हिंदू संघटनांनी घटनास्थळी येऊन या कृतीचा जोरदार विरोध सुरू केला.
पुजाऱ्याचा 'स्वप्नात आदेश'
घटनेची माहिती मिळताच आरसीएफ (RCF) पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुजाऱ्याची चौकशी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, पुजाऱ्याने दावा केला आहे की, त्याला स्वप्नात काली मातेनेच हे स्वरूप धारण करण्याची आज्ञा दिली होती. त्यानुसार त्याने ही कृती केली. मात्र, भाविकांनी ही केवळ धार्मिक आस्थांशी केलेली छेडछाड असल्याचे सांगत कारवाईची मागणी केली.
नक्की वाचा - Tata Sierra: टाटा सिएराची धमाकेदार एन्ट्री! किंमत, फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल,'आहा!,
गुन्हा दाखल आणि अटक
वाढता विरोध आणि धार्मिक भावना दुखावल्यामुळे अखेर पोलिसांनी पुजाऱ्याविरोधात कठोर पाऊल उचलले. पुजाऱ्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 299 (धार्मिक भावना दुखावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. असे प्रकार घडू नयेत यासाठी पोलीसांनी कडक उपाय योजना कराव्यात अशी स्थानिकांनी मागणी केली आहे.