अमजद खान
कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी झाली. मतमोजणी 16 जानेवारी रोजी पार पडली. महापौरसाठी आरक्षण 22 जानेवारी रोजी जाहीर झाले. 30 तारखेला उमेदवारी अर्ज भरले गेले. केडीएमसी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी 12 वाजता वाजता पार पडणार आहे. मात्र केडीएमसी प्रशासनाला महापौर आणि उपमहापौरांच्या दालनाची डागडुजी करण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुले महापौर निवडीनंतर ते बसणार कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दालनाच्या डागडुजीचे काम उद्या पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे, ही बाब समोर आली आहे. हे काम 12 वाजेपर्यंत पूर्ण होणार की नाही याची कोणती ही हमी देण्यात आलेली नाही असं राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून ही अधिकृत त्याबाबत काही भाष्य करण्यात आलेले नाही. उद्या मंगळवारी सहा वर्षानंतर नगरसेवक महापौर उपमहापौर इतर प्रमुख अतिथी केडीएमसीमध्ये उपस्थित राहणार आहेत.
जर दालनाचे काम वेळेत पुर्ण झाले नाही तर नवनिर्वाचीत महापौर आणि उपमहापौर कुठे बसणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूक होऊन 18 दिवस उलटले तरी दालनाची डागडुजी झाली नाही, ती का झाली नाही याची चर्चा आता सुरू झाली आहे. या सर्व कारभाराला जबाबदार कोण अशी विचारणा ही केली जात आहे. केडीएमसीच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणुकीवेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदासाठी शिंदेसेनेच्या हर्षाली थवील-चौधरी आणि उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. या दोन्ही उमेदवारांसमोर अन्य कोणचाही अर्ज प्राप्त झालेला नसल्याने या दोन्ही पदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. महापालिकेच्या महासभेत दुपारी १२ महापौर आणि उपमहापौरांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.