जाहिरात

KDMC News: कल्याण डोंबिवलीत महापौरांची निवड होऊनही महापालिका 'रामभरोसे'? भाजपा नगरसेवकाच्या एका प्रश्नाने खळबळ

Kalyan Dombivli News: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन आता बराच काळ लोटला आहे.

KDMC News: कल्याण डोंबिवलीत महापौरांची निवड होऊनही महापालिका 'रामभरोसे'? भाजपा नगरसेवकाच्या एका प्रश्नाने खळबळ
Kalyan Dombivli News: कल्याण डोंबिवलीत भाजपा नगरसेवक आक्रमक झाले आहेत.
कल्याण:

Kalyan Dombivli News: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन आता बराच काळ लोटला आहे. राज्यातील इतर महापालिकांमध्ये निवडणुका झाल्यानंतर तिथे महासभेचे कामकाज देखील सुरू झाले आहे. मात्र, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अद्याप पहिली महासभा आयोजित करण्यात आलेली नाही. या विलंबामुळे निवडून आलेले प्रतिनिधी असूनही महापालिकेत अजूनही प्रशासकीय राजवटच सुरू आहे का, असा संतप्त सवाल भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी थेट महापौर आणि सचिवांची भेट घेऊन जाब विचारला आहे.

काय आहे वादाचा मुद्दा?

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी पार पडली होती आणि 16 जानेवारी रोजी त्याचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया देखील शांततेत पार पडली. 

नियमानुसार, महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी आणि कर दर निश्चित करण्यासाठी महासभा होणे अत्यंत आवश्यक असते. महापालिका अधिनियमानुसार, ही महासभा 20 फेब्रुवारीच्या आत घेणे बंधनकारक आहे. मात्र, आता 20 फेब्रुवारीची तारीख उलटून गेली तरी अद्याप सभेचे आयोजन करण्यात आलेले नाही. यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

( नक्की वाचा : Kalyan News: 15 मिनिटांत ऐरोली आणि थेट तळोजा मेट्रो! कल्याणकरांच्या प्रवासाचा 'कायापालट' करणारा 'मेगा प्लॅन' )
 

भाजपा नगरसेवक आक्रमक

भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आज (मंगळवार, 24 फेब्रुवारी) महापौर हर्षाली थविल चौधरी आणि सचिव किशोर शेळके यांची भेट घेऊन या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली. महापालिकेत लोकनियुक्त बोर्ड अस्तित्वात आले असतानाही निर्णय प्रक्रियेत नगरसेवकांना स्थान मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. 

वेळेत महासभा घेतली जात नसेल, तर सर्व कारभार अजूनही प्रशासकाच्याच हाती आहे का, अशी विचारणा म्हात्रे यांनी केली आहे. महापालिकेचे आर्थिक नियोजन आणि शहराच्या विकासाचे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ही सभा तातडीने होणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

( नक्की वाचा : Dombivli News: 100 कुटुंबांचा संसार उघड्यावर येणार? KDMC च्या एका चुकीच्या निर्णयामुळे डोंबिवलीत संतापाची लाट )

महापौर आणि सचिवांनी काय सांगितलं?

या भेटीदरम्यान दीपेश म्हात्रे यांनी महासभेची तारीख तातडीने जाहीर करण्याची मागणी केली. यावर महापौर हर्षाली थविल चौधरी आणि सचिव किशोर शेळके यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तांत्रिक बाबी तपासून लवकरच महासभेचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. आता ही महासभा कधी पार पडते आणि रखडलेले प्रशासकीय निर्णय मार्गी लागतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com