अमजद खान, प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नाकार्तेपणाचं एक उदाहरण समोर आलं आहे. डोंबिवलीमधील सावळाराम क्रीडा संकुल हे खेळाचं मैदान आहे. या मैदानाच्या दुरावस्थेमुळे नियोजीत स्पर्धा रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ठाकरे गटाकडून या मैदानावर शालेय विद्यार्थ्यांकरीता क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा उद्यापासून (शुक्रवार 9 जानेवारी, 2025) सुरु होणार होती. मैदानाच्या दुरावस्थेमुळे ही स्पर्धा रद्द करावी लागली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना ट्रॉफी आणि मेडल देऊन उपहासात्मक सन्मान करीत निषेध नोंदविला आहे.
क्रीडा संकुलात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी क्रिडा स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा 10 ते 12 जानेवारी रोजी या दरम्यान होणार होती. या स्पर्धेत जवळपास तीन हजार स्पर्धक सहभागी होणार होते. स्पर्धेच्या आयोजनाकरीता 6 नोव्हेबर रोजी क्रिडा संकुल बुक करण्यात आले होते.
( नक्की वाचा : Pregnant Women: ही कसली नोकरी? महिलांना गर्भवती करा आणि लाखो कमवा... )
या स्पर्धेच्या आयोजनासाठी मैदान सुस्थितीमध्ये असणे आवश्यक होते. पण, स्पर्धेच्या आदल्या दिवशी आयोजकांनी या मैदानाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांना क्रीडा संकुल खोदून ठेवलेले दिसले. मैदानात दारुच्या काचेच्या बाटल्या पडलेल्या दिसल्या. त्यावर माती टाकण्यात येत होती. खराब मैदानामुळे विद्यार्थ्यांना दुखापत होण्याचा धोका होता. त्यामुळे आयोजकांना ही स्पर्धा रद्द करावी लागली.
ही स्पर्धा रद्द झाल्यानं शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला. पक्षाच्या पदाधिकारी वैशाली दरेकर, तात्या माने, अभिजीत सावंत,प्रतिक पाटील यांनी केडीएमसी मुख्यालय गाठले. केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या दालनात जाऊन त्यांना जाब विचारला. त्यांना ट्रॉफी आणि मेडल देऊन त्यांचा उपहासात्मक सन्मान केला. याच क्रिडा संकुलात स्पर्धा घ्यायची आहे. हे मैदान लवकरात लवकर सुस्थितीत करा अशी त्यांनी मागणी केली. येत्या फेब्रुवारीपर्यंत दुरुस्ती झाली नाही तर ठाकरे गटाकडून उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.