Kalyan News: बालेकिल्ल्यात सत्ताधारी शिवसैनिकच हतबल, प्रशासनाला इशारे देऊनही घेतली जात नाही दखल

शिवसैनिकांच्या इशाऱ्या नंतरही कल्याण डोंबिवलीतील परिस्थिती जैसे थे अशीच होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान 

सत्ताधारी म्हटले की हमखास काम होणार याची हमी असते. पण त्याला कल्याण डोंबिवली अपवाद आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत चार आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. खासदार ही सत्ताधारी पक्षाचेच आहेत. त्यात ही शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक वर्चस्व कल्याण डोंबिवलीत आहे.  असं असलं तरी शिवसेना शिंदे गटाला शहरातील रस्त्यावरील खड्डे, पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला नेहमी साकडे घालावे लागते. काही वेळा  सज्जड इशारे द्यावे लागतात. पण त्याचा काही एक परिणाम प्रशासनावर होत नाही अशीच स्थिती आहे. त्यामुळे शिवसैनिक समस्या सोडविण्यासाठी हतबल झाले आहे की काय अशी जोरदार चर्चा आहे. 

सत्ताधाऱ्यांनाच प्रशासन जुमानत नसल्याचे चित्र कल्याण डोंबिवलीत पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्याची खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्डे पडल्याने नागरीकांसह वाहन चालकांच्या रोषाला प्रशासनासह लोकप्रतिनिधींना समोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेकडून दवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. यंदा रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी 30 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कामे 10 प्रभाग क्षेत्रातून जवळपास 13 कंत्राटदाराना विभागून दिली आहेत. 

नक्की वाचा - Dombivli Marathi Controversy: मराठीत बोलण्यास नकार, महिलेची अरेरावी; मनसेच्या एन्ट्रीनंतर सगळ्यांची जिरली

रस्त्यावरील खड्डे गणेशोत्सवा आधी बुजविले गेले पाहिजेत, यासाठी आयुक्तांनी बैठक घेतली होती. रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नाही तर कंत्राटदार आणि अधिकारी यांची गय गेली जाणार नाही असा दमही आयुक्तांनी भरला होता. मात्र आयुक्तांचा हा इशारा फोल ठरला. गणेशोत्सव उलटून गेला तरी रस्त्यावरील खड्डे भरले गेले नाहीत. केवळ पाहणी आणि आदेशाचा फार्स केला गेला. रस्त्यावरील खड्डे भरले गेले नाही तर अधिकाऱ्यांना धडा शिकविला जाईल, असा इशारा कल्याण पश्चीमेचे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिला होता. 

नक्की वाचा - Kalyan News: गँगस्टर नन्नू शहाच्या पावलावर पुतण्याचे पाऊल, कल्याणमध्ये खंडणी सत्र सुरू होणार?

त्यांच्या इशाऱ्या नंतरही  परिस्थिती जैसे थे अशीच होती. आत्ता शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वेचे शहर  प्रमुख निलेश शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आयुक्तांचे दालन गाठले. त्यांच्या दालनातील चर्चे दरम्यान रस्त्यावरील खड्डे बुजविले जात नाहीत. केवळ आयुक्तांकडून पाहणी केली जाते. त्यामुळे नागरीकांसह वाहन चालकांच्या रोषाला आम्हाला समोरे जावे लागते. आयुक्तांनी येत्या सात दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत, पाण्याची समस्या सोडविली नाही, तर  आत्ता हात जोडतोय, नंतर हात सोडणार असा सज्जड दम देण्याची वेळी शिवसेनेच्या शहर प्रमुखांवर आली आहे. सत्तेत असून त्यांना प्रशासनाला अल्टीमेट द्यावा लागत आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिक हतबल असल्याचे दिसून येत आहे अशी चर्चा सध्या कल्याण डोंबिवलीत रंगली आहे. 

Advertisement