पहिल्याच पावसात KDMC ची पोलखोल, संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

KDMC Rain Update : कल्याण डोंबिवलीत महापालिकेच्या नालेसफाईची पहिल्या पावसातच पोलखोल झाली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
KDMC Rain Update : पहिल्याच मोठ्या पावसात कल्याण डोंबिवलीकरांचे हाल झाले.
कल्याण-डोंबिवली:

अमजद खान, प्रतिनिधी

कल्याण डोंबिवलीत महापालिकेच्या नालेसफाईची पहिल्या पावसातच पोलखोल झाली आहे. कल्याण पूर्वमधील पिसवली भागात सर्वात बिकट परिस्थिती आहे. पिसवलीमध्ये गुडघ्यापर्यंत पावसाचे पाणी साचले होते.  केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना नागरीकांनी जाब विचारला. आमचे नुकसान कोण भरुन देणार? वारंवार सांगून देखील नालेसफाई झाली नाही. जे नाले बांधले ते चुकीचे बांधले. सांगून देखील काही कारवाई केली नाही, अशी तक्रार करत नागरीकांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कल्याण डोंबिवलीमध्ये गुरुवारी (20 जून ) जोरदार पाऊस झाला. डोंबिवलीत सागर्ली परिसरात पाणी साचले. कल्याण पूर्वेतील पिसवली परिसरातील श्री कॉलनी , ज्योर्तिलिंग कॉलनी, धनश्री कॉलनी  मधील नागरीकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरीकांच्या घरातील गृहपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर त्यांच्या काही अधिकाऱ्यांसोबत पोहचल्या. मुंबरकर यांना पाहताच नागरीक भडकले. या परिसरात बांधलेले नाले हे चुकीच्या पद्धीतने बांधलेले आहेत. नालेसफाई देखील व्यवस्थीत झालेली नाही असा आरोप नागरीकांनी केला. 

या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करुन देखील लक्ष दिले नाही. मुंबरकर यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त करीत घेराव घातला. मुंबरकर यांनी नालेसफाईचे खाबर अभियंत्यावर फोडले. स्थानिक माजी नगरसेवक मोरश्वर भोईर यांनी महापालिकेच्या चूकीमुळे नागरीकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे त्यांच्या घरातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई महापालिकेने करावी अशी मागणी केली.

( नक्की वाचा : भिवंडी, ठाणे, पालघरमध्ये कोसळधार; कुठे पूल तर कुठे भाजी मार्केट पाण्याखाली  )
 

आम्ही 15 वर्षांपासून या भागात राहतो. नाला चुकीचा बांधल्यानं पावसाचे पाणी घरात शिरले आहे. त्यामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशी तक्रार येथील स्थानिक सरिता पाटील यांनी केली. या संदर्भात एकाही लोकप्रतिनिधीने केडीएमसीला जाब विचारलेला नाही. आज ठिकठिकाणी नागरीकांना त्रास सहन करावा लागला. याची साधी विचारपूसही एकाही लोकप्रतिनिधींना केली नाही. लोकसभा निवडणूकीत मतांसाठी घरोघरी जाणारे लोकप्रतिनिधी आता कुठे गेले असा संतप्त सवाल नागरीकांनी उपस्थित केला आहे.

Advertisement

कल्याणमधील सखल भागात पाणी 

शुक्रवारी सकाळी कोसळलेल्या पावसामुळे कल्याण पूर्वेतील सखल भागातील आडीवली गावातील गणेश चौक परिसरातील चाळी, दुकाने , इमारतीमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. रस्ते जलमय झाल्यानं नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली . दुकाने ,इमारतीमध्ये पाणी शिरल्याने काही ठिकाणी मोटर, पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न नागरिकाकडून सुरू होता. अडिवली परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून नाले आणि गटारांची कामे करण्याची मागणी करण्यात येत आहे. पण, पालिका प्रशासन सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.